डोंबिवली : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्रीपदी कपिल पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी जाहीर अभिनंदन केले आहे. त्याबाबतचे पत्र भोईर यांनी पाटील यांना गुरुवारी पाठवले आहे. प्रथमच आगरी समाजातील व्यक्तीस केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. हा समस्त आगरी समाजाचा बहुमान असल्याचे भोईर म्हणाले.
पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून पंचायतराज व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण प्राधान्य द्याल, ही अपेक्षा असल्याचे भोईर यांनी पत्रात म्हटले आहे. दिवे अंजूर ग्रामपंचायतीचे सरपंच ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ते भिवंडीचे खासदार व आता केंद्रीय मंत्री असा पाटील यांचा यशाचा चढता आलेख विस्मयकारक असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या पंचायतराजच्या तीनही व्यवस्थेमध्ये कार्य केले असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासंदर्भात ते अतिशय खंबीरपणे कार्य करतील, अशी आशादेखील त्यांनी व्यक्त केली. पाटील यांच्या नेतृत्वाखाली केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संबंध देशातील ग्रामीण भागाला न्याय मिळेल, याची खात्री असल्याचे भोईर म्हणाले.
---------