ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घोडेबाजाराला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कठोर पावलं उचलली आहेत. जिल्ह्यातील बँकर्सनी बँक खात्यामधील १ लाखावरील व्यवहारांची तसेच संशयास्पद व्यवहारांची माहिती निवडणूक खर्च कक्षास दैनंदिन देणे बंधनकारक केले आहे.
आज जिल्हास्तरीय बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात २१ सप्टेंबर पासुन विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्यातील सर्व बँकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, अशी सूचना करून जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले ,बँकेची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांमधून कोणत्याही परिस्थितीत बँके शिवाय अन्य कोणत्याही त्रयस्थ संस्थेची , व्यक्तीची स्वरूपाची रोख रक्कम नेली जाणार नाही याची बँकानी खात्री करून रोख रकमेच्या तपशीलासह बँकेची कागदपत्रे वाहनासोबत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या बँकींग व्यवहाराबाबत मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध लागू केले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या वेबसाईटवरून उपलब्ध करून घेऊन सर्व बँकर्सनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी.
यावेळी उप निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा सोमाणी, उप जिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, लीड बँकेसह इतर बँकांचे मॅनेजर, प्रतिनिधी उपस्थित होते.
मुद्रणालय आणि हॉटेल व्यवसायिकांना सूचना निवडणूक काळात पत्रक, भित्तिपत्रकाच्या दर्शनी भागात प्रकाशकाचे नाव, पत्ता, असणे अनिवार्य आहे.तसेच छपाई केलेल्या पत्रकासाठी किती मोबदला घेतला याबाबत ठराविक नमुन्यात माहिती देणे आवश्यक आहे. तसेच मुद्रित दस्तावऐवजाची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात तीन दिवसाचे आत पाठविणे अनिवार्य आहे. असे न झाल्यास संबंधितास 6 महिने पर्यंत कारावास, किंवा 2 हजार दंडात्मक कारवाई अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. तसेच निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना हॉटेल, रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी ठेवणे हा प्रकार लाचलुचपत या प्रकरणात मोडेल.