लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : भार्इंदर पूर्वेच्या बाळाराम पाटील मार्गावरील रोवीदत्त या ३५ वर्षे जुन्या इमारतीतील चौथ्या मजल्याची बाल्कनी खालील मजल्यांच्या सदनिकांवर कोसळली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चार मजली रोवीदत्त इमारतीच्या ए विंगमधील ४०१ क्रमांकाच्या सदनिकेची बाल्कनी कोसळली. त्यामुळे तिसऱ्या, दुसऱ्या व पहिल्या मजल्याच्या बाल्कनी एकावर एक कोसळत खाली आल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालिका निवडणूक तोंडावर असल्याने नगरसेवकांसह इच्छुकांचीदेखील धावपळ सुरू झाली. ही इमारत धोकादायकच्या यादीत नसली तरी ती जुनी झाल्याने तत्काळ रिकामी करण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी रहिवाशांना अत्यावश्यक सामान काढून दिले. इमारतीमध्ये ३२ सदनिका व १२ दुकाने आहेत. ३२ कुटुंबांना तलाव मार्ग व नवघर पालिका शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात आले आहे. इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट सुरू करण्यात आले आहे. त्याच्या अहवालानंतरच ती राहण्यास योग्य आहे का, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
भार्इंदरमध्ये बाल्कनी कोसळली
By admin | Updated: June 29, 2017 02:52 IST