लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: रात्री उशिरापर्यंत लोकलची वाट पाहत फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशाला थेट फिल्मी स्टाइल तलवारीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न सोमवारी कल्याण रेल्वेस्थानकात घडला. प्रवाशाने आरडाओरड केल्याने फलाटावर तैनात असलेल्या रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले आणि त्यांनी निखिल वैरागर (२१) याला अटक केली.
वैरागर याने यापूर्वी किती प्रवाशांना लुटले याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे प्रवाशाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबिवली येथे राहणारा एक तरुण हा २९ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कल्याण स्थानकावर फलाट नंबर- दोनच्या पुलाखाली लोकलची वाट बघत होता. इतक्यात पुलावरून त्याच्या जवळ आलेल्या वैरागर या तरुणाने त्याच्या शर्टच्या आत लपवून ठेवलेली तलवार काढली. तलवारीचा धाक दाखवत जवळ असलेले पैसे आणि मोबाइल दे नाहीतर मारण्याची धमकी त्याने दिली. मात्र तरुणाच्या सुदैवाने लोकलच्या प्रतीक्षेत असलेला आणखी एक प्रवासी तलवार बघून न घाबरता विरोधाकरिता पुढे सरसावला. त्या दोघांनी आरडाओरड केल्याने ड्युटीवर असलेल्या पोलिसांचे लक्ष गेले. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत निखिल याला ताब्यात घेतले. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नेऊन निखिलच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला मंगळवारी रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. डी. शार्दुल यांनी बुधवारी दिली. ती तलवार त्याने कुठून आणली आणि तो थेट रेल्वेस्थानकात कसा आला, यामुळे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
-------
वाचली