ठाणे : प्रशासनाला त्रास होतो, म्हणून दुसऱ्या मजल्यावर असलेले विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालय सील करण्यात आले असून हा कारभार तळमजल्यावरील कॉंग्रेसच्या गटनेत्यांच्या कार्यालयातून हातळला जाणार आहे. पालिकेच्या या भूमिकेला राष्ट्रवादीने विरोध केला असला, तरी पालिकेमार्फत तळमजल्यावरील केबीनचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यामुळे आता महापौरांनीच विरोधी पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही केबीन आहे त्याच जागी ठेवावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे या दालनावरून पालिकेत वातावरण तापले आहे.नियमानुसार ठाणे महापालिकेत मनसे, कॉंग्रेसला कार्यालय मिळणार नाही. त्यात राष्ट्रवादीचे- विरोधी पक्षनेतेपदाचे कार्यालयही हटवण्याच्या निर्णयाने वादाला तोंड फुटले आहे. कॉंग्रेसच्या केवळ तीन जागा असल्याने आणि मनसेने भोपळाही फोडला नसल्याने, त्यांच्या केबीन पालिकेने ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. आता प्रशासनाने थेट विरोधी पक्षनेत्यांचे कार्यालयच दुसऱ्या मजल्यावरुन तळमजल्यावरील कॉंग्रेसच्या गटनेतेच्या कार्यालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्या कार्यालयाचे काम सुरु झाले असून तोवर दुसऱ्या मजल्यावरील कार्यालय सील करण्यात आले आहे. हे कार्यालय पालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी उपयोगात आणले जाणार आहे. शिवाय विरोधी पक्षनेत्यांच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयातील सततच्या राबत्यामुळे अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाल्याचे कारण देत प्रशासनाने ते हलवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. प्रशासनाच्या या भूमिकेला राष्ट्रवादीने विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशीही चर्चा केली. शिंदे यांनीही विरोधी पक्षाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेत, दुसऱ्या मजल्यावर कार्यालय असावे अशी भूमिका घेतली आहे. त्यातूनही ते हलवायचे झाल्यास पहिल्या मजल्यावर असावे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. तशा आशयाचे पत्र त्यांनी आयुक्तांनी पाठविले आहे. तोवर तळमजल्यावरील कार्यालयाचे काम सुरु झाल्याने प्रशासन नमती भूमिका घेणार का, पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी) - सुरूवातील हे कार्यालय पहिल्या मजल्यावर होते. त्यानंतर ते दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. आता ते थेट तळमजल्यावर हलवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करत त्यांनी त्याबाबत निषेध नोंदवला.
विरोधी पक्षनेत्याच्या केबीनवरुन वातावरण तापले
By admin | Updated: March 10, 2017 04:16 IST