कल्याण : मांडा-टिटवाळा परिसरात पाच टन क्षमतेचा कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यास केडीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी एक कोटी ६९ लाख ४० हजार रुपये खर्च येणार आहे. त्यात भांडवली व देखभाल दुरुस्तीचा खर्च समाविष्ट आहे. या प्रकल्पास भाजपा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी विरोध केला. तो नोंदवत सभापती रमेश म्हात्रे यांनी प्रकल्पास मंजुरी दिली आहे. केडीएमसी हद्दीतून गोळा होणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी उंबर्डे, आयरे, राजूनगर, कचोरे, बारावे, तिसगाव येथे १० टन क्षमतेचे हे प्रकल्प उभारले जातील. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी प्रत्येकी पावणेदोन कोटी खर्च अपेक्षित आहे. उंबर्डे व आयरे येथील प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आले आहे. हे प्रकल्प महिनाभरात तर मंजुरी मिळालेले उर्वरित प्रकल्प वर्षअखेर सुरू होतील.याशिवाय, शिवसेना सदस्य संजय पाटील यांच्या प्रभागात तसेच वैजयंती घोलप यांच्या प्रभागात गांडूळ खत प्रकल्प सुरू झाले आहेत. घोलप यांच्या प्रभागात तीन मशीन बसवण्यात येत आहेत. एक कार्यान्वित केली आहे. उर्वरित दोन कार्यान्वित करणे अपेक्षित आहे. एका मशीनचा खरेदी खर्च तीन लाख रुपये आहे. नगरसेवक त्यांच्या निधीतून ही यंत्रखरेदी करून प्रभागात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करू शकतात. (प्रतिनिधी)
टिटवाळ्यात बायोगॅस प्रकल्पाला मंजुरी
By admin | Updated: April 24, 2017 02:17 IST