अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या जुन्या ठेकेदाराची कचरा उचलण्याची मुदत संपल्याने पालिकेने या कामासाठी नव्या ठेकेदाराची नेमणूक केली आहे. कामाचे आदेश देण्याआधी पालिकेने या ठेकेदाराला निविदेतील तरतुदीप्रमाणे ६० नव्या घंटागाड्या खरेदी करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी तीन महिन्यांची मुदतही पालिकेने दिली आहे.अंबरनाथ पालिकेतील घनकचरा प्रकल्पातील तरतुदीप्रमाणे कामे होत नसल्याची तक्रार होती. तसेच जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नव्या ठेकेदारासाठी पालिकेने निविदाही मागविल्या होत्या. या निविदा मागवितांना पालिकेने प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र घंटागाडी देण्याची आणि ही गाडी नवी असेल अशी अट टाकली होती. सोबत रस्त्याच्या शेजारी साठणारा कचरा उचलण्यासाठी दोन कॉपॅक्टर गाड्यांचीही तरतूद केली होती. गाड्यांची संख्या वाढल्याने या निविदांची किंमत ही दुप्पट झाली होती. या वाढीव किमतीमुळे पालिकेकडे अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र शहरात स्वच्छतेचे काम व्यवस्थित करता यावे यासाठी नव्या गाड्यांचा आणि वाढीव गाड्यांचा प्रस्तावावर पालिका ठाम राहिली. या निविदेला पालिका सभागृहात बहुमताने मंजुरीही मिळाली. मात्र या संदर्भात काही नगरसेवकांनी तक्रारी सुरुच ठेवल्याने ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यास विलंब झाला. अखेर पालिका प्रशासनाने या संदर्भातील माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देऊन कामाचा ठराव मंजूर केला. तसेच मे. समीक्षा कन्स्ट्रक्शन कंपनीला कचरा उचलण्यासाठी लागणाऱ्या गाड्या मागविण्याचे आदेश दिले आहे. बंधिस्त घंटागाडी तयार करुन ते प्रभागात कामासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ठेकेदाराने गाड्या उपलब्ध करुन न दिल्यास त्याच्यावर पालिका कारवाई करणार आहे. अंबरनाथ पालिका क्षेत्रात सरासरी ९० टन कचरा उचलण्यात येत आहे. या निविदा प्रक्रियेत ठेकेदाराला किमान ८० टन कचरा उचलणे बंधनकारक राहणार आहे. सोबत जेवढा टन कचरा गोळा केला जाईल त्या प्रमाणेच ठेकेदाराला बिल दिले जाईल. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त कचरा गोळा करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडुन केला जाणार आहे. कचरा उचलल्यावर त्याचे मोजमाप करण्यासाठी वजनकाटा उभारण्यात येणार आहे. तसेच नव्या ठेकेदाराला प्रत्यक्ष कचरा उचलण्याच्या कामाचे आदेश दिल्यावरच जुन्या ठेकेदाराचे काम बंद करण्यात येणार आहे.‘‘ ठेकेदाराला नव्या घंडागाड्या खरेदीसाठी पालिकेने आदेश दिले आहेत. या गाड्या तीन महिन्यांच्या आत आणणे बंधनकारक आहे. महिन्याभरातच गाड्या आल्या, तर लागलीच त्याला कचरा उचलण्याच्या कामाचे आदेश दिले जातील. - गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपालिका
अंबरनाथमध्ये ६० घंटागाड्या
By admin | Updated: April 10, 2016 01:18 IST