- सदानंद नाईकलोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : महापालिका शाळा क्र. २९ व ८ च्या प्रांगणातील हिरकणी कक्षात शुक्रवारी दुपारीच ओली पार्टी सुरू असल्याचा भंडाफोड शरद पवार गटाचे नरेश गायकवाड यांनी केला. कक्षात दारूच्या तीन भरलेल्या बाटल्या व इतर साहित्य मिळून आले. याप्रकरणी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. बदलापूरच्या शाळेतील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या आवारात ही पार्टी कुणी आयोजित केली होती. शिक्षक व कर्मचाऱ्यांनीच पार्टी आयोजित केली नव्हती ना, अशी शंका व्यक्त होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं. ३, फॉरवर्ड लाइन चौक परिसरात पालिका शाळा क्र. २९ व ८ आहेत. शाळेत शेकडो मुले शिक्षणाचे धडे गिरवितात.
कामगार वापर करतातशाळेच्या आवारात तीन हिरकणी कक्ष आहेत. या सर्वच कक्षांना अवकळा आली आहे. हिरकणी कक्षाचा वापर सफाई कामगार करीत असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी दुपारी १२ वाजता शरद पवार गटाचे पदाधिकारी नरेश गायकवाड यांनी शाळेच्या शिक्षकांना घेऊन हिरकणी कक्षात काय चालले, याची पाहणी केली. तेव्हा त्यांना दारूच्या भरलेल्या तीन बाटल्या आढळल्या.
कारवाईची मागणीगायकवाड यांनी सक्त कारवाईची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे. उपायुक्त अजय साबळे यांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची माहिती दिली. शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कॅमेऱ्याच्या आधारे हिरकणी कक्षात कोण येते-जाते, याची माहिती शिक्षकांना व शाळा प्रशासनाला मिळू शकत नाही का? की शाळा प्रशासनाची याला मूक संमती आहे, असे प्रश्न गायकवाड यांनी विचारले.