मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे निर्देश पाळले जात नसल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढीस लागली आहे. त्यातच ५० टक्के क्षमतेची परवानगी असताना शहरातील बार-हॉटेल तुडुंब भरलेले असतात तर लग्न आदी समारंभासही पायदळी तुडवली जात आहे.
सरकारने हॉटेलना ५० टक्के इतक्याच ग्राहक संख्येच्या मर्यादेत सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु शहरातील लहान मोठी हॉटेल, बार हे ५० टक्के ग्राहक क्षमतेने चालवलेच जात नाही. बार, हॉटेलचे तर बहुतांश कर्मचारीच मास्क घालत नाहीत. अनेकजण तर नाकाच्या किंवा तोंडाच्या खाली मास्क घालतात. कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने काही हॉटेल बंद करण्याची कारवाई करूनही अन्य बार, हॉटेलचालक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. हॉटेलमध्ये गर्दी जमते तशीच धोकादायक गर्दी शहरातील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्यांवर होत आहे. या हातगाड्यांवर होणारी गर्दीही कोरोना फैलावाचे निमंत्रण मानले जात आहे. शहरातील लग्न, साखरपुडासारख्या समारंभांनाही संख्येची मर्यादा घालण्यात आलेली आहे. परंतु अशा लग्न समारंभांनाही प्रचंड गर्दी होत असून बहुतांश जण मास्क न घालताच मिरवत असतात. अंत्यविधीसाठी दिलेल्या २० लोकांच्या मर्यादित संख्येचे सुद्धा खुद्द पालिकेच्या किंवा खासगी स्मशानभूमी, दफनभूमीमध्ये पालन केले जात नाही.