भिवंडी : बसचालक प्रभाकर गायकवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या रिक्षाचालकावर कारवाई करावी, अशी मागणी कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने निजामपूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी पुन्हा आंदोलन करतील, असा इशारा दिला आहे.भिवंडी आगाराच्या प्रवेशद्वाराजवळ तर कधी आगारात रिक्षाचालकांचा वेढा असतो. याप्रकरणी आगार व्यवस्थापकांनी निजामपूर पोलीस ठाण्यात वारंवार पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. बुधवारी रात्री गायकवाड बस आगारात नेत असताना रिक्षाचालकासोबत हाणामारी झाली. या प्रकरणी गायकवाड तक्रार देण्यासाठी निजामपूर पोलीस ठाण्यात गेले होते. पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना हा गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आणि या घटनेच्या निषेधार्थ आगारातील कर्मचाऱ्यांनी बंद पाळला.बंदमध्ये सहभागी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. यावरून हे प्रकरण दाबून कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे या घटनेची चौक शी करून संबंधित रिक्षाचालक व त्याचे साथीदार यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच आगाराच्या आवारातील रिक्षाचालकांची मुजोरी बंद करून प्रवेशद्वारावर असलेले रिक्षातळ त्वरित हटवावेत. त्याचप्रमाणे आगारातील कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. याबाबत कारवाई न झाल्यास कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचा उद्रेक होऊन आंदोलन केले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकावर कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन
By admin | Updated: February 13, 2017 04:57 IST