पावसानंतर भूस्खलनाने दोन घाटातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 04:36 AM2019-08-06T04:36:56+5:302019-08-06T04:37:00+5:30

माळशेज, आंबेनळी घाटावर परिणाम; युद्धपातळीवर काम सुरु

After the monsoon, landslides caused traffic jams in two valleys | पावसानंतर भूस्खलनाने दोन घाटातील वाहतूक ठप्प

पावसानंतर भूस्खलनाने दोन घाटातील वाहतूक ठप्प

Next

ठाणे/ पोलादपूर : जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. सोमवारी सकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात संरक्षक भिंत व भूस्खलन झाले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक सोमवारी पूर्णपणे थांबवण्यात आली. तर, पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर सोमवारी सायंकाळी रानकडसरी ते प्रतापगड फाट्यादरम्यान दोन ठिकाणी आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली.

कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. या घाटातील सावर्णे गावापासून जवळच ८५/६०० क्रमांकाची रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत पडली आहे. याशिवाय, भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडला. रात्र असली तरी जीवितहानी झाली नाही. ट्रॅफिक पोलीस व बीटमार्शल यांच्या सतर्कतेने घाटातील वाहतूक नियंत्रणात आणून घटनेच्या ठिकाणी बचावात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.

तर, उल्हास नदीच्या पुरात रायता ब्रिजजवळील रस्ता वाहून गेला. या महामार्गावर मोरोशी चेकनाक्याच्या परिसरात झाडे पडली आहेत. मातीचा ढीग रस्त्यावर आहे. मोरोशी व आवळ्याचीवाडी यासह सावर्णे गावाजवळ आणि ठिकठिकाणच्या भूस्खलनाचा मातीचा ढिगारा जेसीबी मशीनच्या साहाय्याने युद्धपातळीवर हटवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, रायता ब्रिजजवळील रस्ता दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. महामार्गावरील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले.

तर, पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यातच आंबेनळी घाटात दाट धुके असल्याने कामात व्यत्यय येत आहे. घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम चालू आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानंतर पहाणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमृत पाटील, मनोहर निकम आणि ठेके दार दशरथ उतेकरगेले होते. पहाणी करून पोलादपूरकडे येताना सायंकाळी ७ वाजता दुसरी दरड कोसळली. त्यामुळे हे अधिकारीही अडकले आहेत. दरम्यान महाबळेश्वर- प्रतापगड रस्त्या दरम्यान दुधोशी फाट्याजवळ रस्ता खचला असल्याने प्रतापगडवरील पर्यटकांना मार्ग बंद झाला आहे.

Web Title: After the monsoon, landslides caused traffic jams in two valleys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.