मुंबई : मुंबईतील सर्व चौपाट्यांवर स्वच्छतेसाठी अतिरिक्त यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांनी प्रशासनाला केली आहे. गिरगाव चौपाटी येथे स्वच्छतेसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या पाहणीदरम्यान खारगे बोलत होते.महानगरपालिका क्षेत्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत २२७ निवडणूक प्रभागांत प्रत्येकी एका ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. महापौर स्नेहल आंबेकर, महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे यांच्यासह ठिकठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी स्वत: या श्रमदानात सहभागी होत जनतेला प्रोत्साहित केले. मुंबईकरांचाही सहभाग वाढता असून, श्रमदानासाठी नागरिकांसह स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थाही सरसावत आहेत. आंबेकर यांनी जी/दक्षिण विभागात सार्वत्रिक श्रमदानामध्ये सहभाग घेतला. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी एच/पश्चिम विभागात सार्वत्रिक श्रमदानाच्या उपक्रमाचा आढावा घेतला. दरम्यान, नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेत त्याची व्यापकता प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचावी यासाठी महापालिकेने हा उपक्रम सुरू केला आहे. (प्रतिनिधी)
चौपाट्यांच्या स्वच्छतेस अतिरिक्त यंत्रणा
By admin | Updated: November 10, 2014 01:42 IST