ठाणे: चंदनवाडीतील कालीका हाईटस्, महाकाली डेव्हलपर्संमधील २२ सदनिकांच्या खरेदीसाठी एका खासगी वित्तीय संस्थेतून २२ कोटींचे कर्ज देण्याच्या नावाखाली ८८ लाख ६७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी श्रद्धानंद भोसले याच्याविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पैसे देण्यास नकार देऊन व्यवहार कोर्टात नेण्याचीही धमकी भोसले याने दिल्याची तक्रार ३२ वर्षीय राहूल बेलवले या इंटेरिअर डिझायनरने केली आहे.
ठाण्यातील चंदनवाडी परिसरात राहणाऱ्या बेलवले यांना श्रद्धानंद भोसले याने महाकाली डेव्हलपर्स, कालीका हाईटर्स या इमारतीमध्ये २२ सदनिका खरेदीसाठी तसेच गुंतवणूकीसाठी अल्प व्याज दराने २२ कोटींचे कर्ज करुन देण्याची बेलवले यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये बतावणी केली होती. मात्र , कर्जाच्या मंजूरीसाठी एक वर्षांचे व्याज दोन कोटी नऊ लाख रुपये ही प्रोसेसिंग फी म्हणून आगाऊ द्यावी लागेल, असेही त्याने सांगितले. त्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून बेलवले यांनी त्याला रोख तसेच आरटीजीएस करून एकूण ८८ लाख ६७ हजार रुपये दिले. इतके करूनही त्यांनी कर्जाची लोन मंजूर केले नाही. नोव्हेंबर २०२२ ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. ते १ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेलवले यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अखेर १८ आॅगस्ट २०२३ रोजी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.