ठाणे : नववर्षाच्या स्वागताकरिता भरपूर दारू पिऊन बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या ७७५ तळीरामांकडून ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल १४ लाख १६ हजारांचा दंड वसूल केला. यासाठी ठाणे, भिवंडी, उल्हासनगर आणि कल्याण या विभागांत सुमारे ५०० अधिकारी, कर्मचारी गुरुवारी तैनात केले होते.वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या अधिपत्याखाली चार उपविभागांतील २३ युनिटच्या सुमारे ८० अधिकाऱ्यांमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. ठाण्यातील तीनहात नाका, कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, आनंदनगर नाका, कोपरी, माजिवडा जंक्शन, गोल्डन डाइज नाका तसेच कल्याणमधील महामार्ग, एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, लाल चौकी, दूधनाका, दुर्गाडी चौक, पारनाका आदी भागांत तसेच भिवंडीतील वंजारपट्टी नाका, कल्याण नाका, जकात नाका, धामणकर नाका, उल्हासनगरासह अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरांत नाकाबंदी करून २४ श्वास विश्लेषक यंत्राद्वारे ही तपासणी करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांशी मद्यधुंद वाहनचालकांनी हुज्जत घालून कारवाईत अडथळे आणण्याचेही प्रकार केले. तर कल्याण-डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल २१७ जणांवर कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
७७५ मद्यपींकडून १४ लाखांची वसुली
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST