मीरा रोड येथील रुग्णालयात यशस्वी उपचार
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : कोरोना पॉझिटिव्ह आणि हृदयासंबंधी विकार असणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या हृदयातून सात सेंटीमीटरची गाठ काढण्यात येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. सहा तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू होती. कोरोनामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते.
मूळची कोल्हापूरची असणारी योगिता पाटील हिचा नुकताच विवाह झाला. लग्नाच्या काही दिवसांनी तिला अचानक श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवू लागला. वैद्यकीय चाचणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. श्वास घेता येत नसल्याने या महिलेला ऑक्सिजनची गरज पाहता कुटुंबीयांनी तिला तातडीने मीरा रोड येथील खाजगी रुग्णालयात हलवले. डॉ. उमेंद्र भालेराव म्हणाले की, ज्यावेळी या महिलेला आणले तेव्हा तिला श्वास घेताना त्रास जाणवत होता आणि पायाला सूज होती. त्यांना ऑक्सिजनवर ठेवले होते.
अशा स्थितीत डॉ. अनुप टकसांडे यांनी या महिलेची इकोकार्डिओग्राफी तपासणी केली. या चाचणीत महिलेच्या हृदयाच्या उजव्या वरच्या भागात सात सेंटिमीटर इतक्या मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे रक्तप्रवाहात अडचणी येत होत्या. फुप्फुसाला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नव्हता. मायक्सोमा नावाचा हा हृदयाचा ट्युमर होता. या आजारावर वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावू शकतो. डॉ. भालेराव म्हणाले, कोविडचा संसर्ग बरा झाल्यानंतर तिच्या हृदयावर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेवर पाच दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला घरी सोडण्यात आले.