ठाणे : श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट न करता, त्यांना कोणतीही पूर्व$सूचना न देता येथील सुमारे ४५ इमारतींना पालिकेने धोकादायक इमारतींच्या यादीत समाविष्ट करून इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. काही बड्या राजकीय नेत्यांचे व बिल्डरांचे हितसंबंध जपण्याकरिता हेतूत: चांगल्या इमारती धोकादायक ठरवल्या जात असल्याचा आरोप केला जात आहे.ठाणे महापालिकेने मागील महिन्यात शासनाच्या नव्या धोरणानुसार शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचे नव्याने सर्व्हेक्षण केले होते. त्यानंतर या इमारतींची वर्गवारी करुन ज्या इमारती ‘सी वन’मध्ये आल्या असतील त्या तत्काळ तोडण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मागील वर्षी शहरात ३६ अतिधोकादायक इमारती होत्या. यंदा नव्या निकषानुसार शहरात ८९ इमारती या अतिधोकादायक ठरल्या आहेत. शहरातील एकूण ३ हजार ६०७ इमारती या धोकादायक घोषित केल्या आहेत. परंतु, इमारत धोकादायक असल्याचे जाहीर करण्यापूर्वी त्या संदर्भातील नोटीस देणे अपेक्षित होते. तसेच इमारत जर धोकादायक ठरली असेल तर सदर इमारतधारकांना स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगितले जाते. त्यानंतरच ती रहिवासाकरिता धोकादायक घोषित करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न करता पालिकेने श्रीनगर भागातील श्रीनगर कॉम्प्लेक्समधील ४५ इमारतींना धोकादायक जाहीर केले आहे. पालिकेने अशा प्रकारे कारवाई करताना प्रथम विश्वासात घेणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता आणि इमारती सुस्थितीत असताना अशाप्रकारे केवळ नोटीसा बजावून पालिकेने त्या तोडण्याचा घाट घालण्याचे कारस्थान केल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या संदर्भात येथील रहिवाशांनी आवाज उठविल्यानंतर महापौर संजय मोरे यांनी मध्यस्थी करून चुकून अशा प्रकारच्या नोटीस काढल्याचे सांगत सारवासारव केली. (प्रतिनिधी)महापालिकेचा हा अजब कारभार असून अशा प्रकारे सुस्थितीत असलेल्या इमारती कुठलीही शहानिशा न करता धोकादायक कशा ठरवू शकते. १९८५ च्या आसपास या इमारती बांधल्या असून त्या आजही चांगल्या स्थितीत आहेत. पालिकेने धोकादायक घोषीत करण्यापूर्वी स्ट्रक्चरल आॅडिट करण्यास सांगणे अपेक्षित होते. - प्रदीप इंदूलकर, स्थानिक रहिवासी ठाणे शहरातील काही इमारतींना अशा पद्धतीने जर नजरचुकीने धोकादायक इमारती ठरवून महापालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या असतील तर तातडीने निर्णय घेवून या नोटीसा मागे घेण्याची कार्यवाही प्रशासनाने करावी, असे लेखी आदेश दिले आहेत. - संजय मोरे, महापौर - ठामपा
४५ इमारती ठरवल्या जीर्ण!
By admin | Updated: May 25, 2016 04:32 IST