उल्हासनगर : पेट्रोलपंपात भागीदाराचा करार करून ३२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील रजनी पांडे यांचा विश्वास संपादन करून ठाण्यातील दिना सोडा यांनी पेट्रोलपंपात भागीदाराच्या नावाखाली फववणुक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं-४ साईबाबा मंदिर परिसरात रजनी पांडे कुटुंबासह राहतात. त्यांच्या ओळखीच्या दिना सोडा यांनी त्यांचा विश्वास संपादन करून पेट्रोल पंपात भागीदाराचा व्यवसाय करण्याचा प्रस्ताव ठेवला. पांडे यांनी त्याला होकार दिल्यावर, दोघींनी पेट्रोल पंपात भागीदाराचा करारनामा केला. पांडे यांनी सुरूवातीला २८ लाख धनादेशाद्बारे तर ४ लाख ६० हजार रोख स्वीकारली. एकूण ३२ लाख ६० हजार दिल्यानंतरही भागीदारी दिली नसल्याने पांडे यांनी पैसे परत मागितले. पैशाचा तगादा लावूनही पैसे परत देत नसल्याने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.पोलिसांनी सोडा या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस तपास करत असून नागरिकांनी कागदपत्रे पडताळणी करूनच मोठ्या रकमेचा व्यवहार करावा, असा सल्ला पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिला आहे.
महिलेची ३२ लाखाला फसवणूक ,मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:04 IST