सदानंद नाईक, उल्हासनगर: पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा असलेल्या दुर्गेश वारे या तरुणाचे अपहरण करून ३० हजाराची खंडणी उघडल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
उल्हासनगर म्हारळगाव मध्ये राहणारा दुर्गेश कैलाश वारे याला गुरवारी रात्री पावणे बारा वाजता परडाईज इमारत येथून देवा खेडकर नावाच्या तरुणाने चाकूचा धाक दाखवून जबरीने कार मध्ये बसविले. कारने त्याला कांबागावाच्या जंगलात नेऊन, ३ साथीदारांना बोलाविले. तेथे दुर्गेश याला जबर मारहाण करून ३० हजाराची खंडणी त्यांनी वसूल केली. पहाटे ३ वाजता त्यांच्या तावडीतून सुटल्यावर दुर्गेश वारे याने मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून झालेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केल्यावर, कॅम्प नं-३,चोपडा कोर्ट परिसरात राहणाऱ्या अजय बागुल याला या गुन्हा प्रकरणी अटक केली. तर त्याचे ३ साथीदार अद्याप फरार झाले आहेत.
मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी अजय बागुल याला न्यायालया समोर उभे केल्यावर, न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी दिली. पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करीत असून फरार आरोपीचा शोध घेत आहे. दुर्गेश कैलाश वारे हा रेल्वे पोलीस विभागात असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.