कासा : डहाणू तालुक्यातील आंबोली जवळील महामार्गावरून २५ लाख किंमतीच्या प्लॅस्टिक दाण्याची चोरी झाल्याची घटना घडली.चालक इम्रान खानने नरसी नेणसी अँड सन्स रोडलाईन्स च्या गाडीतील प्लॅस्टिकच्या दाण्यांचा रस्त्यातच अपहार करून ती गाडी अॅपोलो हॉटेल जवळ सोडून देवून तो फरार झाला आहे. या दाण्याचा उपयोग प्लॅस्टिकच्या महागडया वस्तू बनविण्यासाठी केला जात असून त्यांची अंदाजे किंमत २५ लाख ६८ हजार एवढी आहे.दरम्यान गुजरातमधील शौकत अली यांच्या मालकीची ट्रक भाडेतत्वावर निळकंठ रोडलाईन्स कंपनीस चालविण्यास दिली होती. या रोडलाईन्स ने हा ट्रक नरसी नेणसी अँड सन्स कंपनीस भाडेतत्वावर दिला होता. या ट्रकमध्ये रायगड (नागोठणे) येथील प्लॅस्टिक कंपनीतून भरलेला माल अहमदाबाद येथे पोहोचवायचा होता. परंतु चालकाने तो दिलेल्या पत्त्यावर न पोहोचवता त्याचा रस्त्यातच अपहार केला, अज्ञाताला माल विकून गाडी हॉटेल जवळ सोडून पळ काढला याबाबत त्याच्या विरूध्द कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक विजय कुमार देशमुख अधिक तपास करीत आहेत. यामुळे कारखानदारांत आणि व्यापाऱ्यांत घबराटीचे वातावरण आहे. कारण या परिसरातील सर्वच कारखाने आपला माल प्रामुख्याने ट्रकनेच इच्छितस्थळी पाठवित असतात. (वार्ताहर)
२५ लाखांच्या प्लॅस्टिकची ट्रकचालकानेच केली चोरी
By admin | Updated: February 9, 2017 03:44 IST