मुरबाड : महाराष्ट्र राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे जिल्हातील मुरबाड तालुक्यात आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १२७ ग्रामपंचायती असलेला हा तालुका आदिवासीबहुल म्हणून ओळखला जात असून आदिवासींच्या नावाने राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना कागदावरच आहे. यामुळे तालुक्यात सुमारे २१९ बालके ही तीव्र कुपोषित असून यापैकी टोकावडे प्रकल्पात १२८ बालके असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने दिली आहे. ० ते ६ वयोगटातील तीव्र आणि मध्यम तीव्र गटात मोडणाऱ्या कुपोषित बालकांना आंगणवाडी सेविकेच्यामार्फत प्रती बालकांमागे दर दिवशी ४ रु पये ९२ पैसे खर्च करण्याचा आदेश आहे. अंगणवाड्यांमधून मधून पोषण आहार म्हणून लापशी, खिचडी, उसळ,लाडू व टॉनिक यासारखे सकस अन्न महिला बचत गटांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. गरोदर महिला, स्तनदा मातानाही भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना व राजमाता जिजाऊ मिशनअंतर्गत पौष्टीक आहार देण्यात येत असतो. परंतु, आदिवासी क्षेत्रातील महिलांना या सर्व योजनांचा लाभ मिळतो का या वर मोठे प्रश्नचिन्ह आहे. ठाणे जिल्हा परिषदेने जून २०१६ च्या अखेरीस ० ते ६ वयोगटातील बालकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये सर्वसाधारण वजनगटात तीव्र वजनाची सुमारे २२५ बालके आढळून आली होती. एकंदरित कुपोषणमुक्तीचे सरकारकडून होणारे प्रयत्न या भागात तोकडे पडत असून दिवसेंदिवस कुपोषणाचा गंभीर प्रश्न अधिकाअधिक तीव्र होतांना दिसत आहे.
मुरबाडमध्ये २१९ कुपोषित बालके
By admin | Updated: October 4, 2016 02:22 IST