सिंगापूर, थायलंड, हाँग काँगनंतर आता भारतातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले असून ठाण्यात एका २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. संबंधित रुग्णावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू होते. वसीम सय्यद, अशी मृताची ओळख असून तो ठाण्यातील मुंब्रा येथील रहिवासी होता.
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले की, "संबंधित रुग्णाला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अचानक त्याची तब्येत बिघडल्याने त्याला आयसीयूमध्ये हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. शुक्रवारी हा रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला." मिळालेल्या माहितीनुसार, हा रुग्ण मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होता. शवविच्छेदनानंतर कोरोनाच्या नियमांनुसार, रुग्णावर अंतिम संस्कारांसाठी मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपवण्यात येईल. याबाबत फ्री प्रेस जर्नलने वृत्त दिले.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरू असून, गेल्या २४ तासांत आणखी ४५ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सर्वाधिक ३५ रुग्ण आढळून आले आहेत.त्यानंतर पुणे महानगरपालिका-४, रायगड-२, कोल्हापूर महानगरपालिका-२, ठाणे महानगरपालिका-२ आणि लातूर महानगरपालिका परिसरात एक रुग्ण आढळला आहे.