पंकज रोडेकर, ठाणेस्पर्धात्मक युगात जिल्हा परिषदेच्या शाळांनी तग धरण्याबरोबर त्यांचा दर्जा उंचवावा आणि प्रत्येक शाळा १०० टक्के प्रगत करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील १३५ शाळा दत्तक घेतल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४२ शाळा शहापूर तालुक्यातील आहेत.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेत वाढ होऊन आदर्श शाळा तयार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून दरवर्षी विविध योजना राबवण्यात येतात. शासनाच्या २२ जून २०१५ रोजीच्या अध्यादेशानुसार ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग सरसावला आहे. या विभागातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी यांनी प्रत्येकी एक शाळा दत्तक घेतली आहे. या शाळेला हे अधिकारी दर महिन्याला भेट देणार असून शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याने त्या शाळेचा शैक्षणिक दर्जाही सुधारण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या एकूण १३७४ शाळा आहेत. त्यापैकी पाच तालुक्यांतील १३५ शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत. त्यात, शहापूर तालुक्यातील ४२, मुरबाड ३३, भिवंडी २३, अंबरनाथ १९ आणि कल्याणमधील १३ शाळांचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांनी घेतल्या १३५ शाळा दत्तक!
By admin | Updated: February 16, 2016 02:38 IST