स्नेहा पावसकर / ठाणेजिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन होऊन यंदा २५ वर्षे पूर्ण होत असून फसवणूक झालेल्या आणि मंचाकडे दाद मागणाऱ्या ग्राहकांचे प्रश्न मंच सोडवत असतो. २०१६ या वर्षात मंचात नव्याने सुमारे ११०० तक्रारी दाखल झाल्या असून त्यापेक्षा जास्त म्हणजे सुमारे १३०० तक्रारी निकाली काढण्यात मंचाला यश आले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकाली लागलेल्या तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.सदनिका खरेदीपासून ते एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी प्रकरणात ग्राहकाला सहज फसवले जाते. यापैकी काही ग्राहकच फसवणूक करणाऱ्याविरोधात तक्रार करतात. मात्र, त्यापैकीही काही ग्राहक पुरावे गोळा करणे, न्यायालयात उपस्थित राहणे, या कारणांमुळे पुढे तक्रार चालवत नाहीत. मात्र, ज्या तक्रारी दाखल होतात, त्या सोडवून ग्राहकाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच कायम प्रयत्नशील असतो. तरीही, फसवणुकीला बळी पडलेल्या अधिकाधिक ग्राहकांनी मंचाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन मंचातर्फे केले जाते. २०१५ मध्ये ९५० तक्रारी निकाली काढल्या होत्या. तर, नवीन दाखल झालेल्या तक्रारींची संख्या सुमारे ११०० होती. यंदाही २०१६ मध्ये नवीन सुमारे ११०० तक्रारी मंचात दाखल झाल्या असून यंदा १३०० तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर, प्रलंबित तक्रारींची संख्या सुमारे २७०० आहे. ग्राहक संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावीपणे करण्यासाठी फिरत्या न्यायालयांची मागणी ग्राहक संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश जोशी यांनी केली.
१३०० तक्रारी निघाल्या निकाली
By admin | Updated: December 24, 2016 03:08 IST