ठाणे : राज्यभरातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये सर्वांत जास्त श्रीमंत बँक म्हणून ओळख असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या संचालकांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी तब्बल १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांसाठी पंचवार्षिक निवडणूक हाती घेतली आहे. यासाठी शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज घेण्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी विद्यमान संचालक बोईसरचे आमदार राजेश रघुनाथ पाटील यांच्यासह राजेश सावळाराम पाटील, ज्येष्ठ संचालक शिवाजी शिंदे, अनिल मुंबईकर, रेखा पष्टे आदी पाच विद्यमान संचालकांसह अन्य आठ जणांनी उमेदवारी दाखल केली. या निवडणुकीसाठी ४ मार्चपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.