ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत यंदा एक लाख तीन हजार ४५१ विद्यार्थी जिल्ह्यात उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण विद्यार्थी संख्येपेक्षा यंदा अकरावी प्रवेशासाठी कला, वाणिज्य आणि सायन्स या तीन प्रमुख शाखांमध्ये एक लाख १२ हजार ९० जागा ठिकठिकाणच्या महाविद्यालयांत उपलब्ध आहेत. यामुळे कमी गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना आवडीच्या शाखेत प्रवेश मिळणे सहज शक्य असल्याचे दिसून येत आहे.दहावीचा निकाल लागताच आॅनलाइन व आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून हाती घेतली जात आहे. येथील माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील वरिष्ठ व कनिष्ठ आदी सुमारे २६१ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी एक लाख १२ हजार ९० जागा उपलब्ध केल्या आहेत. यात ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भार्इंदर आणि नवी मुंबई आदी शहरांतील महाविद्यालयांमध्ये ९९ हजार ३३० विद्यार्थ्यांचे आॅनलाइन प्रवेश उपलब्ध करण्यात आले आहेत. तर, आॅफलाइन अकरावी प्रवेशसाठी १२ हजार ७६० जागा ग्रामीण भागासाठी उपलब्ध आहेत.जिल्ह्यात कला शाखेत १२ हजार ९७० प्रवेश होणार आहेत. यामध्ये २०० प्रवेश विनाअनुदानित आणि ९७० स्वयंअर्थसहायित प्रवेशाचे आहेत. याप्रमाणेच वाणिज्य शाखेमध्ये सर्वाधिक प्रवेशासाठी ५३ हजार ९६० जागा आहेत. सुमारे ४४ हजार जागांवरील प्रवेश अनुदानित तुकड्यांमधील असून चार हजार विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहायित तुकड्यांमध्ये ९६० प्रवेश होतील. विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी यंदा ३२ हजार ४०० जागा आहेत. यातील ३० हजार जागांचे प्रवेश अनुदानित तुकड्यांमध्ये होतील. तर, दोन हजार २०० प्रवेश विनाअनुदानित आहेत. स्वयंअर्थसहायित सुमारे २०० जागा आहेत.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया आहे. यासाठी कला शाखेच्या ७२०, विज्ञान शाखेच्या ९६० जागा आणि वाणिज्यच्या तीन हजार ६०० जागा अकरावीसाठी आहेत. या तिन्ही शाखांचे पाच हजार २८० अनुदानित तुकड्यांमध्ये प्रवेश मिळणार आहेत. सहा हजार ४८० प्रवेश विनाअनुदानित तुकड्यांमध्ये होतील.
प्रवेशक्षमता जास्त ; विद्यार्थी संख्या कमी! अकरावीसाठी ११२०९० जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 03:17 IST