मीरा रोड : आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या सरसकट बेकायदा बांधाकामांना पाठीशी घालत केवळ आतील गुप्त खोल्यांवरची कारवाईच पालिकेने सुरू ठेवली आहे. आणखी १० बार, लॉजच्या तपासणीत केवळ दोन बारमध्येच गुप्त खोल्या आढळल्या. या गुप्त खोल्यांप्रकरणी पालिकेच्या फिर्यादीवरून चार बारमालकांवर एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. मीरा-भार्इंदरमधील अनैतिक व्यवसायाचा केंद्रबिंदू ठरलेल्या आॅर्केस्ट्रा बार व लॉजच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या पोलिसांसह काही लोकप्रतिनिधी व संस्थांच्या मागणीला महापालिकेने मात्र केराची टोपली दाखवली. आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी आदेश देऊनही बेकायदा बांधकामांवर पूर्णपणे कारवाई होत नाही. टीकेची झोड उठल्यावर पालिकेने आता बार व लॉजमधील गुप्त खोल्या तपासणीचे काम हाती घेतले. काशिमीरा व महामार्ग परिसरातील सूर्यप्रकाश, नाइट सिटी, बॉसी, रेड हॉर्स, मेला, नाइट लव्हर्स, ब्ल्यू नाइट व नाइट दी बॅण्ड हे बार, तर सुनील पॅलेस ईन व सरोजा या लॉजच्या तपासणीत दोन ठिकाणी गुप्त खोल्या आढळल्या. नाइट दी बॅण्डच्या मालकाने स्वत:च गुप्त खोली पाडली. तर ब्ल्यू नाइट आॅर्केस्ट्राची गुप्त खोली पालिकेने जमीनदोस्त केली. (प्रतिनिधी)पाच खोल्यांवर कारवाईबुधवारी तपासणी केलेल्या सात आॅर्केस्ट्रा बार-लॉजमधील गोदावरी लॉज, स्पिनिक्स डान्स बार, स्प्रिंग लॉजमध्ये गुप्त खोली सापडली नाही. मॅट्रिक्स व सी मॅजिक बारमधील खोली बारचालकाने स्वत:हून तोडली. मंत्रा, मेमसाबमधील प्रत्येकी १ व कशिश बारमधील तब्बल ३ अशा ५ गुप्त खोल्या पालिकेने तोडल्या. याप्रकरणी मंत्रा, कशिश, मेमसाब व ब्ल्यू नाइटच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० आॅर्केस्ट्रा बार, लॉजची तपासणी
By admin | Updated: April 1, 2017 05:47 IST