पॅरिस : जागतिक क्रमवारीतील अव्वल टेनिसपटू आणि विश्वविक्रमी अकराव्यांदा फ्रेंच ओपन जेतेपद उंचावण्याच्या प्रयत्नात असलेल्या राफेल नदालने अत्यंत चुरशीच्या लढतीत अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्टजमॅन याला धक्का दिला. या शानदार विजयासह नदालने फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली. त्याचवेळी अन्य लढतीत अर्जेंटिनाच्याच जुआन मार्टिन डेल पोत्रो याने धक्कादायक विजय नोंदवताना क्रोएशियाच्या मारिन सिलिच याला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.दोन्ही सामने बुधवारी सुरु झाले, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे सामने थांबविण्यात आल्यानंतर नदाल व पोत्रो यांनी दमदार विजय नोंदवला. १६ ग्रँडस्लॅम विजेता आणि क्ले कोर्टचा बादशाह नदालने पुन्हा एकदा फ्रेंच ओपनमधली आपली हुकमत सिद्ध करताना पहिला सेट गमावल्यानंतरही बाजी मारली. दिएगो याने नदालविरुद्ध पहिला सेट जिंकून आश्चर्यकारक सुरुवात केली. मात्र कसलेल्या नदालने यानंतर जबरदस्त पुनरागमन करताना ४-६, ६-३, ६-२, ६-२ अशी बाजी मारली. तब्बल ३ तास ४२ मिनिटे रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात पहिला सेट गमावल्यानंतर नदालने तुफानी खेळ करताना दिएगोला टेनिसचे धडेच दिले.दुसरीकडे, डेल पोत्रोने जबरदस्त कामगिरी करताना तब्बल ९ वर्षांनी पहिल्यांदाच फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. हा सामनाही कमालीचा चुरशीचा झाला आणि सिलिचने ३ तास ५० मिनिटांमध्ये आपल्याहून सरस मानांकन असलेल्या चिलिचला ७-६(७-५), ५-७, ६-३, ७-५ असे नमविले. याआधी २००९ साली फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठलेल्या डेल पोत्रोने त्याचवर्षी यूएस ओपनचे जेतेपद पटकावले होते. आता उपांत्य फेरीत डेल पोत्रोपुढे बलाढ्य नदालचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)सिमोना हालेपअंतिम फेरीत!जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू रुमानियाच्या सिमोना हालेपने अपेक्षित विजयासह अंतिम फेरी गाठताना स्पेनच्या गर्बाइन मुगुरुझाला पराभवाचा धक्का दिला. सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना हालेपने केवळ १ तास ३२ मिनिटांमध्ये मुगुरुझाचा ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला.हालेपने कारकिर्दीत तिसऱ्यांदा आणि सलग दुसºयांदा फ्रेंच ओपनची अंतिम फेरी गाठली आहे. यंदा तिच्याकडे पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. या शानदार विजयासह हालेपने आपले जागतिक अव्वल स्थानही भक्कम केले आहे.मोठ्या कालावधीनंतर येथे उपांत्य फेरी गाठली असून याविषयी बोलणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. गेल्या अनेक काळापासून मी माझ्या तंदुरुस्तीविषयी शंका होती. माझ्या मनगटाची तीन वेळा शस्त्रक्रीया झाली असून टेनिसमधून निवृत्ती घेण्याच्या खूप जवळ आलो होतो. त्यामुळे माझ्यासाठी व माझ्या संघासाठी हा विजय किती महत्त्वाचा आहे हे सांगण्यासाठी शब्द नाही.- जुआन मार्टिन डेल पोत्रोहा खूप कठीण सामना होता. दिएगो माझा खूप चांगला मित्र असून तो अप्रतिम खेळाडू आहे. पावसामुळे खेळ थांबल्यानंतर मी अधिक आक्रमकतेने खेळलो. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहचल्याचा आनंद आहे.- राफेल नदाल
‘राफा’ची उपांत्य फेरीत धडक; अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:31 IST