पुणे - क्रोएशियाचा मेरिन चिलीच, फ्रान्सचा गिल्स सिमॉन व दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.महाराष्टÑ लॉन टेनिस संघटनेच्या वतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानावर असलेल्या क्रोएशियाच्या मेरिन चिलीचने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत जागतिक क्रमवारीत ८१व्या स्थानावर असलेल्या फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्टचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ६-२ गुणांनी पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. २९ वर्षीय मेरिन चिलीचच्या ताकदवान ग्राउंडस्ट्रोक व सर्व्हिससमोर पिएरे ह्युजूस हर्बर्ट निष्प्रभ ठरला. १ तास ४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. चौथ्या गेमपर्यंत २-२ अशी स्थिती असताना मेरिन चिलीच याने चतुराईने व आक्रमक खेळ करत पिएरेची ६व्या ८व्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी घेतली. दुसºया सेटमध्येदेखील पिएरेला सामन्याच्या शेवटपर्यंत सूर गवसला नाही. या सेटच्या पहिल्याच गेममध्ये मेरिन चिलीच याने पिएरेची सर्व्हिस रोखली. मेरिनने आपले वर्चस्व कायम राखत पिएरेची ७व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वत:ची सर्व्हिस राखत हा सेट ६-२ असा सहज जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.जागतिक क्रमवारीत ८९व्या स्थानावर असलेल्या फ्रान्सच्या गिल्स सिमॉन याने जागतिक क्रमवारीत १९८ व्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या रिकार्डो ओझेदा लाराचा ६-२, ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. १ तास १४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात गिल्स सिमॉन याने आक्रमक खेळ करत पहिला सेट रिकार्डो ओझेदा लारा विरुद्ध ६-२ असा जिंकून आघाडी मिळवली. दुसºया सेटमध्ये चौथ्या गेममध्ये सिमॉनने लाराची, तर पाचव्या गेममध्ये लाराने सिमॉनची सर्व्हिस रोखली व त्यामुळे सामन्यात ३-३ अशी स्थिती निर्माण झाली. सिमॉनने जबरदस्त कमबॅक करत सिमॉनची आठव्या गेममध्ये लाराची सर्व्हिस रोखली व स्वत:ची सर्व्हिस राखत हा सेट ६-३ असा जिंकून विजय मिळविला. उपांत्य फेरीत गिल्स सिमॉन पुढे मेरिन चिलीच याचे आव्हान असणार आहे.अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारणाºया दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने कझाखस्तानच्या मिखेल कुकुशीनचे आव्हान ७-६, ६-४, ६-२ असे परतावून लावत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली. २ तास ३० मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या लढतीत केविनला आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे लागले.पुरुषांच्या दुहेरीत युकी भांब्री व दिवीज शरण यांनी रॉबर्ट लिंडस्टेड-फ्रँको स्कुगर यांना ७-५, २-६, १०-६ असे नमविले. दुसरीकडे रोहन बोपण्णा-जीवन मेदुंचेजियन यांना पीयरे व सिमोन या जोडीकडून ३-६, ५-७ असा पराभव पत्कारावा लागला.सविस्तर निकालउपांत्यपूर्व फेरी : एकेरी : मेरिन चिलीच (क्रोएशिया) (१) वि.वि. पिएरे ह्युजूस हर्बर्ट (फ्रान्स) (८) ६-३, ६-२; गिल्स सिमॉन (फ्रान्स) वि.वि. रिकार्डो ओझेदा लारा (स्पेन) ६-२, ६-३.
महाराष्ट्र ओपन टेनिस : चिलीच, सिमॉन, अँडरसन उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 1:06 AM