नवी दिल्ली : भारत-पाकच्या युवा टेनिसपटूंच्या जोडीने नायजेरियातील आयटीएफ ज्युनियर टेनिसमध्ये उपांत्य फेरीपर्यंत चमक दाखविली.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यापासून भारताने पाकिस्तानसोबतचे संबंध मोडीत काढले. क्रिकेटमध्येही भारताने मागील काही वर्षांपासून द्विपक्षीय मालिकेत पाकविरुद्ध न खेळण्याचे धोरण कायम ठेवले आहे. अन्य खेळांतही भारतीय संघ पाकिस्तानात पाठविण्यात येत नाही. अशावेळी दोन युवा मुलींनी एकत्र येत टेनिसमध्ये पुन्हा एकदा भारत- पाक जोडी बनविली. याआधी भारताचा रोहन बोपन्ना आणि पाकचा ऐसाम-उल-हक कुरेशी यांच्या दुहेरी जोडीने अनेक जागतिक स्पर्धांमध्ये वर्चस्व गाजविले होते.
नायजेरियातील अबुजा येथे झालेल्या या स्पर्धेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. भारत- पाक जोडीने मुलींच्या दुहेरी स्पर्धेत भाग घेतला. भारताची सिद्ध कौर पाकिस्तानच्या सोहा अलीसोबत खेळली. तणावाच्या काळात, दोन्ही मुलींनी रोहन बोपन्ना आणि ऐसाम-उल-हक कुरेशी यांच्यातील पुरुष दुहेरीतील भागीदारीची आठवण करून दिली. ही जोडी ‘इंडो-पाक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाते. २०१० च्या यूएस ओपन दुहेरी स्पर्धेत त्यांनी उपविजेतेपद पटकाविले होते.
सिद्धक कौर-सोहा अली यांनी फेगो आयेतोमा आणि टोलू व्याशी या नायजेरियन जोडीवर ६-३, ६-५ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवत मुलींच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. या विजयाचे नायजेरिया आणि पाकिस्तानमध्ये फार कौतुकही झाले होते.
भारत-पाकिस्तान जोडीला उपांत्य फेरीत नायजेरियाच्या गुडन्यूज ऐना आणि सक्सेस ओगुनजोबी यांच्याकडून २-६, २-६ अशा गुणांनी पराभव पत्करावा लागताच विजेतेपदाची संधी संपुष्टात आली. कुरेशी यांनी टेलिकॉम एशिया स्पोर्ट या वेबसाईटशी बोलताना सांगितले की,‘ एक खेळाडू आणि पाकिस्तान टेनिस फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून आयटीएफ स्पर्धेत आमच्या सोहाने सिद्धसोबत भागीदारी केल्याने मला खरोखर आनंद झाला. भारत- पाक यांच्यातील परिस्थिती काहीही असो, या खेळाडूंची भागीदारी उत्तम आहे आणि मी दोघींनाही शुभेच्छा देतो. मी रोहन आणि इतर भारतीय खेळाडूंसोबत भागीदारी केली आहे आणि मला खूप आदर आणि सन्मान मिळाला. आमची संस्कृती सारखीच आहे. माझ्या मते, खेळ हे संबंध सुधारण्याचे उत्कृष्ट व्यासपीठ आहे.’
सिद्ध कौर ही ऑलिम्पिक सुवर्ण विजेते हॉकीपटू सुरिंदर सिंग सोधी यांची नात आहे. सोधी यांनी १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताला हॉकीचे सुवर्ण जिंकून देण्यात अभूतपूर्व भूमिका बजावली होती.