तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, तितकेच चोरही हाय-टेक झाले आहेत. आतापर्यंत तुम्ही मेसेज किंवा लिंकद्वारे होणारी फसवणूक ऐकली असेल, पण आता चक्क तुमच्या जवळच्या व्यक्तीचा आवाज चोरून तुम्हाला लुटले जात आहे. "बाबा, मला वाचवा, पोलिसांनी मला पकडलंय," अशा आवाजातील फोन कॉल सध्या पालकांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. मात्र, हा आवाज तुमच्या मुलाचा नसून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'चा असू शकतो.
नेमकं काय आहे हे प्रकरण?
कल्पना करा, दुपारी तुम्हाला एका अनोळखी नंबरवरून फोन येतो. पलीकडून तुमच्या मुलाचा हुबेहूब रडण्याचा आवाज येतो- "बाबा, मला वाचवा... पोलिसांनी मला ड्रग्स केसमध्ये पकडलंय... मी काहीही केलं नाहीये." त्यानंतर एक व्यक्ती पोलीस बनून फोन घेते आणि सांगते की, "लगेच ५० हजार रुपये या नंबरवर पाठवा, नाहीतर FIR दाखल करू." घाबरलेले पालक विचार न करता पैसे पाठवतात आणि नंतर कळतं की मुलगा तर ऑफिस किंवा कॉलेजमध्ये सुखरूप बसला आहे.
तुमचा आवाज चोरीला जातोय कसा?
सर्वात मोठा प्रश्न हा की, चोरांकडे तुमच्या मुलाचा आवाज येतो कुठून? याचे उत्तर आहे सोशल मीडिया. आपण इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक स्टोरीज किंवा यूट्यूबवर जे व्हिडिओ शेअर करतो, तिथून चोर आवाज गोळा करतात. आजच्या प्रगत AI तंत्रज्ञानाला कोणाचाही आवाज कॉपी करण्यासाठी फक्त ३ ते १० सेकंदांचा ऑडिओ पुरेसा असतो. यालाच 'व्हॉइस क्लोनिंग' म्हणतात.
भीती हाच चोरांचा धंदा!
सायबर गुन्हेगार जाणतात की, जेव्हा माणूस घाबरलेला असतो, तेव्हा त्याचे डोकं काम करणं बंद करतं. फोनवर मागे पोलिसांच्या गाडीचा सायरन किंवा पोलीस ठाण्यातील गोंधळाचे आवाज ऐकवले जातात. "फक्त १० मिनिटं आहेत, नाहीतर जेल होईल," अशी घाई केली जाते, जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून खातरजमा करू शकणार नाही.
'सेफ वर्ड' ठरेल तुमचे सर्वात मोठे शस्त्र!
या हाय-टेक फसवणुकीपासून वाचण्यासाठी एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे 'फॅमिली पासवर्ड' किंवा 'सीक्रेट कोड'. आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत बसून असा एक गुप्त शब्द ठरवा जो फक्त तुम्हालाच माहित असेल. जर कधी असा भीतीदायक फोन आला, तर समोरच्याला सांगा, ठीक आहे मी पैसे पाठवतो, पण आधी आपला 'सीक्रेट कोड' सांग. जर तो AI आवाज किंवा स्कॅमर असेल, तर तो कोड सांगू शकणार नाही आणि त्याचे बिंग फुटेल.
'या' गोष्टी नेहमी लक्षात ठेवा:
स्कॅमर तुम्हाला फोनवर गुंतवून ठेवू इच्छितो. सर्वात आधी फोन कट करा. आपल्या मुलाच्या किंवा नातेवाईकाच्या वैयक्तिक नंबरवर लगेच कॉल करा. जर त्याने उचलला नाही, तर त्याच्या मित्राला किंवा ऑफिसमध्ये फोन करा. हल्ली 'डीपफेक'द्वारे व्हिडिओ कॉलवर दुसऱ्याचा चेहराही लावला जातो. अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका. तुमचे सोशल मीडिया अकाउंट प्रायव्हेट ठेवा, जेणेकरून तुमचा आवाज आणि व्हिडिओ अनोळखी लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. लक्षात ठेवा, पोलीस कधीही फोनवर पैशांची मागणी करत नाहीत. तंत्रज्ञानाच्या युगात कानापेक्षा मेंदूवर जास्त विश्वास ठेवा.
Web Summary : AI voice cloning scams are targeting parents by mimicking their children's voices in distress. Criminals demand money, exploiting fear. Protect yourself with a family 'safe word' and verify any such calls immediately with family.
Web Summary : एआई वॉइस क्लोनिंग स्कैम माता-पिता को लक्षित कर रहे हैं, संकट में अपने बच्चों की आवाज़ की नकल कर रहे हैं। अपराधी डर का फायदा उठाकर पैसे मांगते हैं। पारिवारिक 'सुरक्षित शब्द' से खुद को बचाएं और ऐसे किसी भी कॉल को तुरंत परिवार से सत्यापित करें।