आजकाल लोक प्रत्येक गोष्ट मोबाईलमध्ये जपून ठेवतात. चित्रपटाच्या तिकिटांपासून ते ड्रायव्हिंग लायसन्सपर्यंत सर्व काही मोबाईलमध्ये स्टोर असतं. आजकाल डिजिटल व्यवहारांसाठीही मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा स्थितीत हॅकर्सचे लक्ष मोबाईलकडेही आहे. ते मालवेअर किंवा व्हायरसद्वारे फोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. जर फोनमध्ये मालवेअर आला तर खूप नुकसान होऊ शकतं. फोनमध्ये व्हायरस आहे की नाही हे कसं शोधायचं ते जाणून घेऊया...
सतत पॉप-अप जाहिराती
जर फोनवर पॉप-अप जाहिराती सतत दिसत असतील आणि त्या स्क्रीनवरून काढून टाकणं कठीण असेल तर ते मालवेअरमुळे असू शकतं. या जाहिरातींवर क्लिक केल्यास फोनमध्ये असलेली पर्सनल माहिती चुकीच्या हातात पडू शकते.
कोणत्याही कारणाशिवाय बिलात वाढ
कोणतीही अतिरिक्त सेवा न घेता तुमच्या फोनचं बिल वाढलं असेल, तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. क्रॅमिंगमुळे अनेक वेळा बिल वाढतं. क्रॅमिंग म्हणजे थर्ड पार्टी कंपनी तुमच्याकडून अशा सेवेसाठी शुल्क आकारते ज्याचा तुम्ही वापरही केला नाही. हे काम मालवेअरच्या माध्यमातून करता येतं.
लवकर बॅटरी डिस्चार्ज
मालवेअरचे एक लक्षण म्हणजे बॅटरीचे लवकर डिस्चार्ज होते. अनेक मालवेअर बॅकग्राऊंडला वेगवेगळी कार्ये करत राहतात. यामुळे बॅटरी लवकर संपते. त्याचप्रमाणे, सामान्य स्थितीतही फोन खूप गरम होत असेल तर ते मालवेअरमुळे देखील असू शकतं.
फोनचा स्पीड कमी होणं
फोनमध्ये मालवेअर असेल तर फोनचा कामाचा वेग कमी होतो. फोनची इतर कामं स्लो होतात आणि काही वेळा टास्क क्रॅशही होतात.
फोनवर नको असलेले ॲप येणं
अनेक वेळा एखादे ॲप डाउनलोड करताना त्याच्यासोबत मालवेअरही डाऊनलोड केले जाते, ज्यामुळे फोनवर अतिरिक्त ॲप्स इन्स्टॉल होतात. त्यामुळे ॲप लिस्टवर लक्ष ठेवा आणि कोणतेही नको असलेले ॲप इन्स्टॉल केले असल्यास ते उघडू नका.