सोलापूर: पाऊस गायब झाल्यामुळे दुष्काळाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत़ सध्या ग्रामीण भागात साडेचार लाख लोकांना १९० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ पाऊस अशाच पद्धतीने रुसला तर जुलैअखेर टँकरची संख्या ४०० वर जाणार असल्याची शक्यता ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ आॅक्टोबर २०१३ ते जून २०१४ या टंचाई कालावधीत पाणीपुरवठ्यावर तब्बल १७ कोटी ५१ लाख खर्च झाले आहेत़ टंचाई निवारणासाठी पुन्हा करोडो रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे़सध्या १९० टँकरद्वारे १८६ गावे आणि ८४४ वाड्यांना ३८६ खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे़ ३१ जुलैपर्यंत पाऊस न पडला तर टँकरची संख्या ३९१ पर्यंत तर ३१ आॅगस्टपर्यंत हीच संख्या ५०० टँकरवर जाईल, अशी भीती पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ एकूण १८२५ हातपंपदेखील सुरू आहेत़ उपलब्ध सर्व पाणीसाठे हे पिण्यासाठीच वापरण्याचे नियोजन केले जात आहे़ दुष्काळ निवारणासाठी स्वतंत्र जिल्हा परिषदेची सभा घ्या, अशी मागणीदेखील विविध सदस्यांनी केली आहे; मात्र याकडे पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत़ माढा तालुक्यातील व्होळेसह २८ गावांच्या पाणीपुरवठा योजना, कोर्टी (करमाळा) या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना दुरुस्तीअभावी तसेच थकीत वीज बिलापोटी बंद आहेत़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ९ योजनादेखील सुमारे पावणेतीन कोटी वीज बिल थकल्यामुळे तसेच दुरुस्तीअभावी बंद आहेत़ त्या सुरू करण्यासाठीदेखील टंचाई निधीतून देयके द्यावीत, अशी मागणी जि़ प़ सदस्य करीत आहेत़------------------------------टंचाई कालावधी वाढवून दिल्याने़़़़टंचाई कालावधीसाठी असलेली ३० जून ही तारीख शासनाने वाढविली आहे़ ती आता ३१ जुलै करण्यात आल्यामुळे टंचाई निधीतून पाणीपुरवठा आणि दुष्काळ निवारणासाठी मुबलक निधी टंचाईतून मिळू शकतो़ प्रादेशिक पाणीपुरवठ्याच्या अनेक योजना वीज बिल न भरल्यामुळे बंद आहेत. टंचाई निधीतून गतवर्षीप्रमाणे ही बिले भरली तर या योजना सुरू होतील. यामुळे सुमारे २०० गावांना पाणी सहज मिळेल़ यासाठी ३ ते ४ कोटींचा निधी लागणार आहे़ शिवाय पाणी टँकर भरण्याची ठिकाणेदेखील तयार होतील़------------------------------------सर्वाधिक टँकर मंगळवेढ्यातसध्या जिल्ह्यात १९० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये सर्वाधिक म्हणजे ४३ टँकर मंगळवेढ्यात सुरू आहेत़ त्या खालोखाल करमाळ्यात ३४, माढ्यात ३२, सांगोल्यात २६, अक्कलकोट आणि माळशिरसमध्ये प्रत्येक ३ तर बार्शीमध्ये सात टँकर सुरू आहेत़ उत्तर सोलापुरात ७ तर दक्षिण सोलापुरात १२ पाणी टँकर सुरू आहेत़ पंढरपुरात एकही टँकर पाणीपुरवठ्यासाठी नाही़
साडेचार लाख लोकसंख्येला टँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Updated: July 6, 2014 00:16 IST