कुर्डूवाडी : माढा तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेला आता वेग आला असून एकूण २ लाख ३१ हजार ८२२ लाभार्थ्यांपैकी १ लाख २९ हजार ५०४ लाभार्थ्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या लसीचा डोस मिळाला आहे. त्यामुळे तालुका लसीकरणाबाबत ६५ टक्क्यांवर पोहोचला असून ही आरोग्य यंत्रणेसह जनतेसाठी दिलासा देणारी गोष्ट आहे.
दररोजच्या कोरोना चाचणीतही अगदी नगण्य बाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे माढ्याची दुसऱ्या टप्प्यातील वाटचाल ही कोरोना मुक्तीकडे आहे.
माढा तालुक्याची लोकसंख्या ३ लाख १७ हजार ८२० इतकी आहे. १८ ते ४४ वयोगटातील १ लाख २६ हजार ४४८ जणांचे लसीकरण झाले आहे. वयोवर्ष ४५ वरील लाभार्थी हे १ लाख ५ हजार ३७४ इतके आहे. म्हणजे एकूण २ लाख ३१ हजार ८२२ जणांना लसीचा डोस दिला आहे. त्यापैकी आतापर्यंत कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला आहे. पहिल्या डोसचे लाभार्थी ९० हजार ५६८, तर दुसऱ्या डोसचे लाभार्थी ३३ हजार ४ आहेत, तर कोव्हक्सिनचा पहिला डोस घेतलेले ३ हजार ३७५, तर दुसरा डोस घेतलेले २ हजार ५५७ लाभार्थी आहेत. त्यामुळे या आकड्यावरून लसीकरणाचा वेग वाढल्याचे दिसून येते. यासाठी तालुका स्तरावरून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, विस्ताराधिकारी संतोष पोतदार, ए. डी. कुंभार, आरोग्य सहायक ए. व्ही. गोंडरे, एन .बी. माळी, एस. ए. होनराव, संतोष देवधरे परिश्रम घेत आहेत.
---
तालुक्यात लसीकरणाने वेग घेतला आहे. विठ्ठलवाडी गावचे शंभर टक्के लसीकरण झाले आहे. ही एक जिल्ह्यात बहुमानाची बाब आहे. काही ठिकाणी आता लसीकरण करताना सुई कमी पडत आहेत; परंतु त्या गावातील ग्रामपंचायतकडून आम्ही त्या उपलब्ध करून घेत आहोत. तालुक्तात आतापर्यंत लसीकरण ६५ टक्क्यावर झाले आहे.
- डॉ. शिवाजी थोरात
तालुका आरोग्य अधिकारी, माढा.
---
सुईचा तुटवडा
ग्रामपंचायतीची धडपड
सध्या लसीकरणदरम्यान आरोग्य विभागाकडून सुईचा पुरवठा कमी आहे. हा पुरवठा ५० टक्केच आहे. त्यामुळे उर्वरित ५० टक्के सुईचा पुरवठा हा लसीकरण संबंधित असलेल्या त्या गावच्या ग्रामपंचायतकडून उपलब्ध करून घेतला जात आहे. हे वास्तव चित्र समोर आले आहे.