सोलापूर: हत्तूर जिल्हा परिषद शाळेतील डमी शिक्षक नेमल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व संबंधित शिक्षकाची खातेनिहाय चौकशी सुरू झाली असून त्यांना आरोपपत्र बजावले आहे.जिल्हा परिषद सदस्य सुरेश हसापुरे यांनी शाळा तपासणी केली असता राजकुमार नडगिरे हे शिक्षक डमी शिक्षक नेमून पगार उचलत असल्याचे आढळले होते. त्यानंतर शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांनीही तपासणी केली होती. चौकशी अहवाल देण्याची जबाबदारी विस्तार अधिकारी बापूराव जमादार यांच्यावर सोपवली होती. जमादार यांनी २३ आॅक्टोबर १३ रोजी दिलेल्या अहवालात केंद्रप्रमुख र.ब. नदाफ, मुख्याध्यापक महादेव ब्याळ्ळे, डमी शिक्षक नेमणारा राजकुमार नडगिरे या तिघांना जबाबदार धरले होते. असे असूनही दबावामुळे कोणावरच कारवाई होत नव्हती. बऱ्याच दिवसांनंतर मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले. केंद्रप्रमुख नदाफ, मुख्याध्यापक ब्याळ्ळे, नडगिरे यांना आरोपपत्र बजावले असून विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. ------------------रजेचा अर्ज नंतर सह्या...नडगिरे हे सतत रजेवर जात असत. रजेचा अर्ज द्यायचा व नंतर येऊन सह्या करायचे. शिक्षणासाठी गावातील एकाला डमी शिक्षक म्हणून नेमले होते. ही बाब मुख्याध्यापक ब्याळ्ळे व केंद्रप्रमुख नदाफ यांच्या संमतीनेच सुरू होती. हा प्रकार माहीत असताना दुर्लक्ष केल्याने तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी कोळी यांनाही नोटीस दिली होती. शिक्षक नडगिरे यांची शिल्लक रजा खर्ची टाकून उरलेल्या कालावधीची ३८ हजार १८४ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
हत्तूर शाळेप्रकरणी तिघांची खातेनिहाय चौकशी
By admin | Updated: June 13, 2014 00:42 IST