सोलापूर : सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सध्या संक्रांतीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे दिसून येत आहे़ संक्रांतीसाठी लागणारी सुगडी बनवण्याच्या कामाने वेग घेतला आहे़ खास आंध्रप्रदेशातून आणलेल्या सुगड्यांना सोलापुरातील महिला पसंती देत असल्याची माहिती कुंभार शरणबसप्पा कुंभार (नीलम नगर) यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
मकर संक्रांतीच्या दिवशी वाणाला अधिक महत्त्व आहे. संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका सण. तीळगूळ घ्या.. गोड गोड बोला.. असा संदेश देत समोरच्यांप्रति प्रेम, आपुलकी, आदर व्यक्त करण्याची संधी या सणाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. महिलांसाठी हा विशेष सण समजला जातो. या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात. हे वाण देण्यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधले जाते. त्यामुळे वाण घेण्यासाठी छोटे खण (सुगडी) २० ते ३० रुपयांना उपलब्ध आहे.
याबाबत माहिती देताना शरणबसप्पा कुंभार म्हणाले की, सोलापूर शहर परिसर व आंध्रप्रदेशातून आणलेली माती चाळून पाण्यात भिजवली जाते. त्यानंतर ती पायाने तुडवली जाते. मातीचा गोळा गोल फिरणाºया चक्रावर ठेवून त्याला आकार दिला जातो. त्यानंतर ती वाळवत ठेवली जाते़ सुगडी प्रतिनग २ रुपये, गाडगे १० ते ३० रुपयांपर्यंत विक्री होते.
संक्रांतीचा उत्साह कायम- संक्रांतीचा १४ जानेवारीला येतो. क्वचित हा सण १५ जानेवारीला येतो. २०१९ मध्ये संक्रांत १५ जानेवारीला आली आहे. संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. वर्षात बारा संक्रांती येतात, पण मकर संक्रांती त्यातली एक महत्त्वाची मानली जाते. गूळ आणि तिळाची जागा आता साखरेच्या तीळगुळांनी घेतली आहे. हा बाजाराचा परिणाम आहे. जागतिकीकरणाचा परिणाम बाजारावर झाला आहे. तोच प्रभाव सणांवर पाहायला मिळतो. बाजारात जे उपल्बध साहित्य असते त्यानुसारच आजकाल सण साजरे केले जातात. मात्र उत्साह तेवढाच आहे. जमाना बदलला तरी सणाचे महत्त्व बदलेले नाही. हेच भारतीय सणांचे वैशिष्ट्य आहे.
संक्रांत हा खास करून स्त्रियांचा सण आहे. संक्रांतीच्या दिवसात घरोघरी स्त्रिया हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित करतात. हळदी-कुंकवाच्या निमित्ताने का होईना स्त्रिया घराबाहेर पडतात, एकमेकींचे सुखदु:ख जाणून घेतात़ आपणच बनवलेली काहीतरी वस्तू यानिमित्त महिलावर्ग एकमेकीस देतात़ यामुळे जिव्हाळा व आपुलकीचे नाते वाढीस लागते़- वैष्णवी सुतार, सामाजिक कार्यकर्त्या, सोलापूर
आधुनिक काळात वाढती प्रगती पाहता कुंभार समाज आजही गरिबीच्या परिस्थितीच आपला व्यवसाय करत आहे. प्रगतीच्या वाटेवर जात असताना मातीपासून तयार होणाºया वस्तूंच्या किमती मात्र जशाच तशा आहेत. प्रचंड मेहनत आहे मात्र, योग्य मोबदला मिळत नाही़- शरणबसप्पा कुंभारकुंभार, नीलमनगर, सोलापूर