अनुसूचित जाती समितीचे सोलापूर मनपावर ताशेरे
By admin | Published: June 23, 2017 02:06 PM2017-06-23T14:06:57+5:302017-06-23T14:06:57+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २३ : मागासवर्गीयांसाठी शासकीय खात्यांमधील अनुशेष भरतीसह विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी शासनाने ६ हजार ३०० कोटींची तरतूद केलेली असताना केवळ ३ हजार कोटी खर्च केला जातो अशी आकडेवारी समोर आली आहे. सोलापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यात जिल्हा परिषद प्रशासनाने जशी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला किंबहुना त्याहून अधिक प्रकार सोलापूर महापालिकेतही आढळून आला. महापालिकेने मागासवर्गीयांच्या अनुशेष भरतीसाठी अनास्था दाखवली. विविध योजनांसाठी असलेला १४ कोटींचा सेस खर्च केला नसल्याबद्दल अनुसूचित जाती कल्याण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.
समितीचे प्रभारी प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी महापालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणाबद्दल नाराजी व्यक्त करताना संबंधितांना सूचना केल्या. हा अहवाल समिती सदस्यांपर्यंत पोहोचवून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे गुरुवारी पत्रकारांना सांगितले. अक्कलकोट तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या वाटपामध्ये सावळा गोंधळ असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. सर्वच ठिकाणी आरक्षण, पदोन्नती, कल्याणकारी योजनांबद्दल फारसे समाधानकारक चित्र नसल्याचे समिती सदस्यांनी स्पष्ट केले. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये मिळालेल्या माहितीनुसार भरतीची प्रक्रिया रिक्त असल्याचे दिसले. यावर पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी शासनाची परवानगी घेऊन कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले. अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात घट झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय खात्यांमधील अनुशेष भरती, कल्याणकारी योजनांच्या कामांची पाहणी करण्यासाठी २० ते २२ जून अशी तीन दिवस महाराष्ट्र शासन अनुसूचित कल्याण समिती सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यासाठी समितीचे प्रमुख डॉ. सुरेश खाडे यांच्यासह प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, रमेश बुंदीले, डॉ. सुजित मिणचेकर, लखन मलिक, सुभाष साबणे, हरीश पिंगळे या आठ जणांचा समावेश होता.
तीन दिवसांच्या दौऱ्यात समितीच्या आठ सदस्यांचा दौऱ्यांमध्ये तीन गट करण्यात आले होते. पहिल्या गटात डॉ. सुरेश खाडे व डॉ. सुचित मिणचेकर यांनी मोहोळ, पंढरपूर, सांगोला तालुक्यातील पाहणी केली. दुसऱ्या गटात प्रा. जोगेंद्र कवाडे, हरीश पिंगळे, लखन मलिक यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुक्यातील विविध खात्यांची पाहणी केली. लोकांची मते जाणून घेतली. तर तिसऱ्या गटातील सुभाष साबणे, प्रकाश गजभिये, रमेश बुंदीले यांनी करमाळा, माढा, बार्शी,माळशिरस तालुक्यात पाहणी केली.
-------------------
सर्व खात्यात अनुशेष भरण्याबद्दल अनास्था
अनुसूचित जाती कल्याण समितीने तीन दिवस केलेल्या दौऱ्यामध्ये जिल्ह्यातील पंचायत समिती, कृषी विभाग, पोलीस ठाणे, सोलापूर विद्यापीठ यासह विविध कार्यालयांना भेटी देऊन मागासवर्गीयांचा अनुशेष भरला आहे याची पाहणी करताना सर्वच खात्यामध्ये याबद्दल अनास्था असल्याचे आढळून आल्याचे समितीचे सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले. मागासवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. बोगस कागदपत्रांद्वारे लाभाथ्याशिवाय दुसऱ्याच व्यक्तीला लाभ देण्याचे प्रकार आढळून आले. या सर्व बांबींच्या आम्ही नोंदी घेतल्या आहेत. संबंधितांना सचिवांसमोर साक्ष होऊन कारवाई करण्यात येणार असल्याचे समिती सदस्यांनी पत्रकारांना सांगितले.
-----------------------
प्राचार्य-कुलगुरु पदासाठी आरक्षण हवे
जिल्ह्यात पाहणीसाठी गेलेल्या अनु. जाती कल्याण समितीला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पदोन्नती, अनुशेष भरतीबद्दल गाऱ्हाणी मांडताना प्राचार्यपदासाठी आरक्षणाची मागणी केली. सोलापूर विद्यापीठातून कुलगुरु पदासाठीही १३ टक्के आरक्षण मिळावे, अशी मागणी करण्यात आली.