फिर्यादी सुशीला नंदकुमार दोडमनी (वय-६०, रा.बनी, हुबळी जि. धारवाड) या कोन्हाळी येथील त्यांचा भाऊ दत्तात्रय जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आल्या होत्या. कार्यक्रम उरकून दुसऱ्या दिवशी शनिवार,२८ ऑगस्ट रोजी सकाळी अक्कलकोट एसटी स्टँडवर थांबल्या होत्या. तेव्हा अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या पर्समधील सोन्याची चेन, गंठण असा चार तोळ्याचा १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज पळवून नेला. त्याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला होता.
त्या घटनेतील महिला आरोपी फरजाना अब्बास शेख (वय ३६, रा.विडी घरकुल, कुंभारी,ता. दक्षिण सोलापूर) ही महिला पुन्हा अक्कलकोट एस. टी. स्टँडवर नेहमीप्रमाणे सावज शोधण्यासाठी मंगळवारी येऊन थांबली होती. खबऱ्याने पोलिसांना कळविले. महिला पोलीस तेथे पोहचल्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे संबंधीत महिला संशयास्पद उत्तरे देऊ लागली. यावरुन तिला अटक केली. बुधवारी तिला येथील कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. याकामी फौजदार चंद्रकांत पुजारी, पोलीस प्रमोद शिंपाळे, चिदानंद उपाध्ये यांनी कामगिरी बजावली.
-----