बार्शी : आजपर्यंत जेवढ्या संघटना सुप्रीम कोर्टात आरक्षणासाठी गेल्या त्या संघटना एक तर आरक्षण मागण्यासाठी व एखाद्याचं आरक्षण रोखण्यासाठी गेल्या. परंतु ब्राह्मण महासंघ ही अशी एकमेव संघटना आहे, की आरक्षण हे जातीवर आधारित न देता ते फक्त कुटुंबाच्या आर्थिक निकषावरच देण्यात यावे, अशी मागणी करीत आहे. समाजातील प्रत्येक जातीधर्मातील गरिबाला आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे, यासाठी काम करत असल्याचे प्रतिपादन ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी बार्शी येथे केले.
ब्राह्मण महासंघ, बार्शी शाखेचा शुभारंभ व राज्यव्यापी ब्राह्मण महासंपर्क अभियान शुभारंभप्रसंगी दवे बोलत होते. बार्शी येथील छत्रपती शंभुराजे मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बार्शी तालुका व जिल्हा स्तरावरील तसेच प्रदेश कार्यकारिणीवरील पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच यावेळी भगवान परशुराम आणि इतर देवतांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ब्राह्मण महासंघाचे विश्वस्त ॲड. विश्वास देशपांडे, श्रीपाद उर्फ राजू कुलकर्णी, मनोज तारे, प्रदेश संपर्कप्रमुख उमेश काशीकर यांच्यासह प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष नमिता थिटे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद्मजा टोळे यांच्यासह सोलापूर, उस्मानाबाद व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते. बार्शीतून प्रदेश कार्यकारिणीवर प्रवीण शिरसीकर, ॲड. विजय कुलकर्णी व मीना धर्माधिकारी यांना घेण्यात आले. बार्शी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी वंदना शिरसीकर, उपाध्यक्षा दीपाली सहस्त्रबुध्दे, कार्याध्यक्ष एड. अनुपमा कुलकर्णी, शहर अध्यक्षा अनघा बडवे, उपाध्यक्ष चैतली पुराणिक, शीतल कुलकर्णी, प्रदेश संघटक प्रवीण शिरसीकर, बार्शी शहराध्यक्ष प्रसाद सहस्त्रबुद्धे, ॲड. कैलास बडवे यांची निवड करण्यात आली.
---
फोटो : ०३ ब्राह्मण महासंघ
बार्शीत ब्राह्मण महासंघाच्या अभियानात अध्यक्ष आनंद दवे यांनी मार्गदर्शन केले.