बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : माढा तालुक्यातील सुलतानपूर, दारफळ, वकाव व मुंगशी येथे पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचावकार्याला वेग आला आहे. कालपासून सुरू असलेल्या मोहिमेत काही नागरिकांची सुटका करण्यात आली असून उर्वरितांसाठी आर्मी व एनडीआरएफचे पथक सक्रीय आहे. सकाळी साडेनऊ दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री सोलापुरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
सुलतानपूर येथे अडकलेल्या नागरिकांसाठी आर्मीमार्फत फूड पॅकेट व पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. एनडीआरएफची अतिरिक्त टीम येथे कार्यरत असून बचाव मोहिमेत सातत्य ठेवले आहे.
दारफळ येथे काल आठ नागरिकांचे एअरलिफ्टिंग झाले होते. उर्वरित 20 नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळपासून पुन्हा ऑपरेशन सुरू झाले असून पाण्याची पातळी घटल्याने बोटीद्वारेही बचाव कार्य सुरू आहे. वकाव येथे 90 नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यासाठी एनडीआरएफचे दुसरे पथक दाखल झाले आहे. दरम्यान, सांगोला तहसीलदार संतोष कणसे हे समन्वय साधत आहेत.
मुंगशी येथे काल काही नागरिकांची सुटका झाली, मात्र अजून 14 लोक अडकले असून त्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त बोटी पाठवण्यात आल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे अडकलेल्या दोन नागरिकांनाही वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.जिल्ह्यात उभारलेल्या शेल्टर कॅम्पमध्ये फूड पॅकेट, पिण्याचे पाणी व टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.