चिंचोली येथील दत्तात्रय कृष्णा इरकर यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या १०० बाय १०० च्या शेततळ्यात १२ हजार मस्यबीज सोडले होते. ते दररोज सकाळी माशांना खाद्य टाकत होते. त्यामुळे या माशांचे वजन किमान २५० ते ७०० ग्रॅम इतके झाल्याने बाजारात ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री अज्ञातांनी शेततळ्याच्या पाण्यात विषारी औषध टाकल्याने १२ हजार मासे मृत्युमुखी पडल्याने शेततळ्याच्या कडेला आले होते.
शनिवारी सकाळी दत्तात्रय इरकर माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती त्यांनी पोलीस पाटील हरिदास पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी शेततळ्याला भेट दिली, तर तलाठी विकास माळी यांनी मृत माशांचा पंचनामा केला. याबाबत दत्तात्रय इरकर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे.
फोटो ओळ :::::::::::::::::::
चिंचोली येथील दत्तात्रय इरकर यांच्या शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने मृतावस्थेतील माशांचे छायाचित्र.