ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 6 - सोलापुरातील होलसेल वाईन विक्री करणा-या चार व्यापा-यांवर आयकर विभागाने दोन दिवसापूर्वी धाडी घातल्या. यामध्ये खूप मोठी रक्कम सापडली असून चार व्यापा-यांकडे सापडलेल्या रकमेपैकी सुमारे १ कोटींचा आयकर मिळणार असून नव्या योजनेनुसार सुमारे ३५ लाख रुपये पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत जमा होणार आहेत.
कोमल वाईन्स सात रस्ता, एलव्ही वाईन्स, रॉय वाईन्स (पंढरपूर), कृष्णा वाईन्स, अशी त्या चार व्यापा-यांच्या फर्मची नावे आहेत. नोटाबंदीच्या कालावधीत म्हणजेच ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत या व्यापा-यांच्या बँक खात्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसे जमा झाल्याचे बँक रेकॉर्डवरुन दिसल्यामुळे या चार व्यापा-यांवर आयकर विभागाने छापेमारी केली.
रॉय वाईन्सकडून यांच्याकडे एक कोटी रुपये सापडल्यामुळे त्यांना आता ३३ टक्के आयकर भरावा लागत आहे. कृष्णा वाईन्स यांच्याकडे २० लाखांची रक्कम आढळली असून त्यामध्ये १० लाखांचा आयकर भरावा लागणार असून पाच लाख रुपये शासनाच्या खात्यामध्ये चार वर्षे न परताव्याच्या अटीवर परत करावे लागणार आहे. कोमल वाईन्स आणि एलव्ही वाईन्स यांच्याकडे सुमारे सव्वा कोटी रुपये आढळले आहेत. त्यामुळे त्यांना आता ६० लाख रुपये आयकर भरावा लागणार आणि ५० टक्के म्हणजेच ६० लाख रुपये शासनाच्या खात्यात भरावे लागणार आहेत.
केंद्र शासनाने पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरू केली असून आयकरमध्ये सापडलेली अतिरिक्त रक्कम ही शासन खात्यात जमा करावा लागणार आहे. जी रक्कम अतिरिक्त सापडते त्यामध्ये ५० टक्के आयकर आणि आयकर भरण्याच्या निम्मी रक्कम ही शासन खात्यात जमा करावी लागणार आहे. सोलापुरात अलीकडे आयकर खात्याने टाकलेल्या धाडीतील ही सर्वात मोठी धाड असल्याचे आयकर विभागाच्या अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.