सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात टॉवर आहे. या टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा त्रास महसूल विभागातील अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना होऊ लागला आहे.
मागील महिन्यात एका आंदोलनकर्त्याने टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या आंदोलनकर्त्यास आंदोलनापासून परावृत्त करणाऱ्या एका महसूल कर्मचाऱ्याला प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे टॉवर बदनाम झाला. यापूर्वी देखील या टॉवरवर अनेकांनी शोले स्टाईलने आंदोलन केले. टॉवर वादग्रस्त ठरत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून टॉवर हटवण्याची मागणी महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर टॉवर काढून टाकण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विचारविनिमय सुरू केला. याबाबत प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. टॉवर हटवण्याऐवजी टॉवरभोवती भिंत बांधण्याची सूचना काहींनी केली. त्या पार्श्वभूमीवर टॉवरभोवती भिंत बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे या वादग्रस्त टॉवरभोवती आता भिंतीचे कुंपण टाकले जात आहे. तीन ते चार फूट भिंत बांधून त्यावर लोखंडी जाळीचे कुंपण देखील टाकण्यात येणार आहे.