सोलापूर : रेल्वे रुळाखालून ड्रेनेजलाईन पार केली नसल्याने मजरेवाडी व कुमठे परिसरातील अद्याप तीन हजार घरांना ड्रेनेज जोडणी रखडली आहे.
विजापूर रोड, जुळे सोलापूर, मजरेवाडी, कुमठे परिसरासाठी राबविण्यात आलेल्या ड्रेनेज योजनेचे काम पूर्णत्वावर आहे. कुमठे मलनिस्सारण केंद्राला होटगी रोड परिसरातील जोडणारी लाईनची अद्याप जोडणी न झाल्याने या परिसरातील मिळकतींना ड्रेनेज जोडणी मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे.
रेल्वे लाईन पार करण्यासाठी मनपाने ड्रेनेज लाईनचे पैसे रेल्वेकडे भरले आहेत. हे काम मार्गी लागावे म्हणून पाठपुरावा सुरू आहे. पण काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याने याचा फटका ड्रेनेज जोडणीला बसला आहे. रेल्वेमुळे ड्रेनेजलाईन जोडणीचे काम पूर्ण न झाल्याने ही समस्या निर्माण झाली तरी मिळकतींना प्रॉपर्टी चेंबर बांधण्याचे काम ठेकेदाराने पूर्ण करण्याचे अपेक्षित होते. पण हे काम अद्याप झाले नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचा अभिप्राय आयुक्तांकडे दिला आहे. आयुक्त व थर्ड पार्टी आॅडिट झाल्यानंतर मनपा हे काम हस्तांतरित करून घेणार आहे. प्रस्तावात दिलेल्याप्रमाणे काम झाले की नाही याची प्रत्यक्षात पाहणी करण्यात येणार आहे. ड्रेनेजसाठी खोदण्यात आलेले जुळे सोलापुरातील अनेक रस्ते दुरूस्त करण्यात आले नाहीत अशा तक्रारी आहेत. याची प्रत्यक्षपणे तपासणी करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी प्रॉपर्टी जोडणीसाठी खोदलेले खड्डे तसेच ठेवण्यात आले आहेत तर काही ठिकाणी सिमेंटने तर काही ठिकाणी प्रिमिक्सने खड्डे भरण्यात आले आहेत़ अनेक ठिकाणी चक्क मुरूम भरून मलमपट्टी करण्यात आली आहे. ज्या भागात काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी ड्रेनेज जोडणीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी फक्त ५00 रुपये डिपॉझिट व अंतराप्रमाणे जोडणी शुल्क आकारण्यात येत आहे.
ठेकेदाराने प्रस्तावाप्रमाणे काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. कामाची तपासणी करण्यात येईल. त्यानंतरच ठेकेदाराचे उर्वरित बिल अदा केले जाणार आहे. ज्या ठिकाणचे काम अद्याप पूर्ण व्हायचे राहिले आहे, ते करून घेतले जाईल. तसेच खड्ड्यांची पाहणी करून दुरूस्ती केली जाईल.- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त