तक्रारीत म्हटले आहे की, माझी पत्नी तृप्ती सतत आजारी असल्याने वेगवेगळ्या दवाखान्यांत उपचार केले; पण तिला फरक पडत नसल्याने उंदरगाव येथे घेऊन गेलो. तेथे सुरुवातीस २१ हजार रुपयांची पावती फाडली गेली. त्यानंतर होमहवन व पूजा करण्यासाठी १ लाख रुपये खर्च लागेल व या पूजेनंतर फरक जाणवेल, असे सांगितले गेले. आपण एक लाख रुपये दिले. मात्र, आठ पंधरा दिवसांनंतर पत्नीस काहीही फरक न पडल्याने मी पुन्हा उंदरगावला गेलो. तेव्हा दहा-पंधरा दिवसांनंतर फरक पडेल, असे सांगितले गेले. त्यानंतर मी तब्बल एक महिना थांबलो; पण पत्नीस काहीच फरक पडला नाही म्हणून मी पुन्हा पत्नीस घेऊन ३१ डिसेंबर २०२० रोजी उंदरगावात भेटलो. तेव्हा एक-दोन दिवसांत फरक पडला नाही तर तुझे पैसे परत करतो, असे मला सांगितले गेले. दुसऱ्या दिवशी फोन करून मला राशीन, ता. कर्जत येथे बोलावले गेले; पण आपण पुणे येथे असल्याने गेलो नाही व दुसऱ्या दिवशी उंदरगाव येथे गेलो. तेव्हा या परिसराचे व्हिडिओ शूटिंग का करतो, असे म्हणून काही जणांनी शिवीगाळ, दमबाजी करून मला व मित्रास बेदम मारहाण केली. तुला पैसे देत नाही काय करायचे ते कर, असे म्हणून उलट आमच्यावरच केस दाखल केली. तेव्हापासून मला व कुटुंबीयांना धोका निर्माण झाला आहे. तेव्हा संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व फसवणूक करून घेतलेली माझी रक्कम परत करावी, असेही रवींद्र म्हेत्रे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
-----