वाघोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट, जलजीवन मिशनअंतर्गत शाळा व अंगणवाडी नळजोडणीचे आणि पाणी नमुने तपासणीचे उद्दिष्ट त्वरित पूर्ण करा; अन्यथा ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शेलार यांनी दिला.
माळशिरस पंचायत समितीच्या राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज सभागृहामध्ये स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सर्व विभागप्रमुख व ग्रामसेवक यांच्या आढावा बैठकीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेलार यांनी आदेश दिले. यावेळी पंचायत समितीचे सभापती शोभा साठे, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र मोहिते, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता मंडलिक, बालविकास प्रकल्प अधिकारी लोंढे, विस्तार अधिकारी खरात, एम. एस. डोके, जिल्हा कक्षामधील पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ. ए. सी. मुजावर, शंकर बंडगर, सचिन सोनवणे, महादेव शिंदे, प्रशांत दबडे यांच्यासह ग्रामसेवक, केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते.
यावेळी शेलार यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत एलओबी, एनएलओबी अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामाचे शिल्लक उद्दिष्ट पूर्ण करणे, जलजीवन मिशनअंतर्गत २ ऑक्टोबरपासून शाळा व अंगणवाडी नळजोडणी करून ऑनलाईन एंट्री पूर्ण करणे, स्वच्छता सर्वेक्षणाच्या माध्यमातून माहिती पूर्ण भरणे, पाणी गुणवत्ताअंतर्गत जैविक व रासायनिक नमुने तपासणीबाबतचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. नळजोडणीचे उद्दिष्ट ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करणे याबाबत शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचा कृती आराखडा तयार करण्याची सूचना देण्यात आली.