प्रदीप यादव - सातारा -वर्धनगडात रात्री सव्वाएक वाजता त्या युवकांनी जे अनुभवलं, जे पाहिलं ते थरारक होतंच; पण त्याहूनही अधिक ते अचंबित करणारं आहे. ओसाड रस्त्यावर उभी असलेली बाई पाहून क्षणभर भांबावलेल्या ते युवक धाडसाने पुढे गेले. तिच्यापासून पाच ते सहा फुटांवरून त्यांची गाडी गेली. त्यांनी जे पाहिलं ते थक्क करणारं होतं... मध्यरात्री एका ओसाड वळणावर वाहनांना हात करणारी पांढऱ्या साडीतला त्या बाईचा चेहरा पुरुषी दिसल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकमत’ने या घटनेच्या मुळाशी जाऊन तपास केला असता स्त्री वेशातील ती व्यक्ती पुरुषच असल्याचे उघड झाले आहे. त्या दोन युवकांनी आपबिती सांगितल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्याची उत्तरं शोधण्यासाठी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. लोकवस्तीपासून दीडशे-दोनशे मीटर अंतरावर असलेलं ते ठिकाण. एका बाजूला तीव्र उतार तर दुसऱ्या बाजूला चढ असे ते वळण आहे. रस्त्याच्या एका बाजूला असलेल्या प्लास्टिक बॅरलचे गोडावून सोडले तर आजूबाजूला जवळपास लोकवस्ती नाही. पण ज्या ठिकाणी ती व्यक्ती उभी राहते, त्याच्यासमोर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. तीव्र चढ-उताराचा वळणदार रस्ता आणि स्मशानभूमी या दोन गोष्टींचा आधार घेऊन ती जागा वाटमारी करायच्या उद्देशाने निवडली असल्याचे दिसते. याबाबत काही लोकांशी चर्चा केली असता ओसाड जागी मध्यरात्री स्मशानभूमी अन् पांढऱ्या साडीतील बाई पाहून साहजिकच कुणीही घाबरून जाईल. वाहनचालकाने गाडी थांबविली तर उद्देश सफल होईल, हा संबंधित व्यक्तीचा विचार असावा, असे काही सुशिक्षितांनी सांगितले. दुरून हा परिसरा सपाट पठारासारखा वाटत असला तरी चढउतारामुळे अनेक खड्डे तयार झालेले आहेत. त्यामुळे लपण्यासाठी याठिकाणी जागा आहे. याचाच फायदा घेऊन प्रवाशांना भीती दाखविण्याचा प्रकार याठिकाणी होत असावा. रणसिंगवाडी येथील एक जण कोरेगावहून येत असताना रात्री पावणेदहाच्या सुमारास याच ठिकाणी त्याला लुटल्याची घटना घडली होती, असे नागरिकांनी सांगितले.या घटनेबद्दल अधिक माहिती वाचा उद्याच्या अंकात.लोकांच्या मनात अंधश्रद्धेचा बागुलबुवात्या ओसाड वळणावरील भयकथेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’नं वर्धनगड, रामोशीवाडी, नेर, फडतरवाडी, पुसेगाव या गावांतील लोकांशी, वाहनचालकांशी चर्चा केली. जवळपास पंधरा-वीस जणांना भेटून त्यांची मतं विचारली. मात्र, दोघे-तिघे सोडता कुणीही या गोष्टीचा शोध न घेता सुरस भयकथा ऐकविल्या. कुणी म्हणालं, अनेक वर्षांपासून त्या वळणावर असे प्रकार घडताहेत. तर कुणी सांगितलं की त्या वळणावर अनेक अपघातात घडलेत. कुणी इतर ठिकाणच्याही ऐकीव कहाण्या रंगवून सांगितल्या; पण कुणीही कधी या घटनेच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. ‘लोकमत‘नं शोध घेऊन हा प्रकार उघड करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचं भूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्रीवेश परिधान केलेला तो तर एक पुरुषी चेहरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2015 00:47 IST