भीमा नदीच्या पूररेषेत सुरू केलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत राष्ट्रवादीसह विविध संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास, ऊर्जा, आदिवासी, विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहेत. हे पत्र जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे आले आहे. यामुळे पंढरपूर पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला स्थगिती दिली आहे.
घर मिळावे यासाठी २०४५ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ९७० जणांनी १० हजार रुपये भरले होते. यामुळे ८९२ घरांची लॉटरी सोडतीदरम्यान कोणाला घर मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत चौकशी करून अहवाल पाठवण्यात येणार आहे. त्यांनतर सूचना मिळाल्यास लॉटरी सोडतची तारीख ठरवण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक...
पंतप्रधान आवास योजनेच्या १ व २ नंबरच्या इमारती समांतर रेषेमध्ये आहेत. परंतु, ३ व ४ या दोन इमारती उतार भागात आहे. यामुळे ३ व ४ इमारतीमध्ये पाणी येत आहे. एक ते चौथ्या इमारतीमध्ये दोन मीटरचा (उतार) फरक आहे. त्यामुळे ब्ल्यू लाईनच्यावर ड्रेनेजलाईन करणे, संरक्षक भिंत उंचावर बांधणे, ब्ल्यू लाईनपर्यंत मुरूम भरून पाणी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तेथे पाणी साचले तर आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या घरांत पाणी शिरेल. यामुळे नवीन नाला बांधावा लागणार आहे. अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जलसंपदा विभागाचे अधिकारी मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे, प्रांत अधिकारी सचिन ढोले, नगर अभियंता नेताजी पवार उपस्थित होते.
फोटो २५पंड०१
पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबतच्या बैठकीत चर्चा करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे, जलसंपदा विभागाचे अधिकारी मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. गावडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरअभियंता नेताजी पवार.