मंगळवेढा शहर, शेलेवाडी, अकोला, गणेशवाडी, खुपसंगी, पाटकळ, नंदुर, निंबोणी, भोसे, हुन्नुर आदी दहा ते अकरा गावांमध्ये परराज्यातून आलेल्या काही विक्रेत्यांनी गावातील स्थानिकांना हाताशी धरून रासायनिक शिंदी विक्रीचे पाय रोवले आहेत. या शिंदी विक्रेत्यांनी बेकायदेशीररीत्या व रासायनिक शिंदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.
अकोला, गणेशवाडी, खुपसंगी येथील काही शिंदी विक्रेते नव्याने सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील गणेशवाडीजवळील पुलावर खुलेआम विक्री करीत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी खुपसंगी येथील एका युवकाने पाटखळ-खुपसंगी हद्दीवर असणाऱ्या शिंदी विक्रेत्याकडे शिंदी प्यायल्यानंतर तो जागेवरच चक्कर येऊन शुद्ध हरपला होता. त्यामुळे गावातील समीर पटेल, दिनेश लेंगरे, अण्णा वाले, गजेंद्र नलवडे, बाळू पटेल यांच्यासह १५ ते २० युवकांनी २८ डिसेंबर रोजी चिवडाप्पा नामक शिंदी विक्रेत्याच्या अड्ड्यावर जाऊन तेथील सुमारे २०० लीटर रासायनिक शिंदी नष्ट करीत साहित्य उद्ध्वस्त केले व पुन्हा विक्री केल्यास तुझी गय केली जाणार नाही, असा दम दिला.
कोट ::::::::::::::::::::::
मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदेवाल्यांविरोधात कारवाई करू.
- ज्योतीराम गुंजवटे,
पोलीस निरीक्षक मंगळवेढा