कुर्डू हे गाव कुस्तीच्या आखाड्यातील वस्ताद आण्णासाहेब ढाणे यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले गाव. तसेच दुग्ध व्यवसायातही संपूर्ण राज्यात ग्रामीण भागातील सर्वाधिक चिलिंग प्लांट असणारी ओळखही याच गावाला प्राप्त झाली. आ. बबनराव शिंदे, आ. संजयमामा शिंदे यांचाही हाच जिल्हा परिषद गटाचा बालेकिल्ला होय. त्यामुळे या गावाला ग्रामपंचायत निवडणुकीबरोबरच कोणत्याही निवडणुकीत महत्त्व आहे. हे गाव कुर्डूवाडीपासून टेंभुर्णी मार्गावर अवघ्या सात किलोमीटर अंतरावर आहे. या गावात नेहमीप्रमाणे दोन पारंपरिक दोन गटांत निवडणूक होत आहे. त्याला येथील चार अपक्ष उमेदवारांनीही आव्हान दिले आहे.
गावामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, माजी उपसभापती अशी मातब्बर मंडळी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहेत. वाॅर्ड क्रमांक ६ मधून वस्ताद आण्णासाहेब ढाणे यांच्या विरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील हे निवडणूक लढवीत आहेत. शिवाय अपक्ष उमेदवार सुदामती अनंतकवळस, साधना जगताप, बाळू भोसले, मंगल गुंडगिरे यांनीही निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे.
कुर्डू ग्रामपंचायतची स्थापना ही १९५४ सालची. एकूण १७ सदस्य संख्या असलेले हे गाव राजकीय, धार्मिक, आर्थिक, व्यापारी व क्रीडाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. संदीप पाटील, सर्जेराव जगताप, नामदेव हांडे, भारत कापरे हे कुर्डू शांतता व विकास आघाडीचे नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या विरुद्ध नागनाथ विकास आघाडीचे नेतृत्व वस्ताद आण्णासाहेब ढाणे हे करीत आहेत. या ठिकाणी घरातीलच, भावकीतले उमेदवार आमने-सामने आहेत. त्यामुळे येथील निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ............
प्रचारातील मुद्दे-
वाड्यावस्त्यावरील रस्ते, शाळा डिजिटल करणे, अंतर्गत गटारी व रस्ते करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा अर्धपुतळा निर्माण करणे, गावाला स्वतंत्र ॲम्बुलन्स देणे, गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करणे, सुसज्ज ग्रंथालय उभा करणे, शेतकऱ्यांना गोटा उपलब्ध करणे.
चौकट
कुर्डू ग्रामपंचायत
लोकसंख्या- ९२१५,
मतदार- ७३००,
प्रभाग- सहा,
ग्रामपंचायत सदस्य संख्या -१७ .............
प्रमुख लढत- कुर्डू शांतता व विकास आघाडी विरुद्ध
नागनाथ विकास आघाडी