सोलापूर : बार्शी तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावर असलेल्या शोभेच्या दारुच्या कारखान्यात मोठा स्फोट झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे. अजूनही कारखान्यामध्ये स्फोटके हे सुरुच आहेत. पांगरी येथील एकाचा हा कारखाना आहे. ही लागलेली आग विझविण्यासाठी सोलापूर शहर, उस्मानाबाद, लातूर, कुर्डूवाडी, बार्शी नगरपालिकासह अन्य जिल्ह्यातील अग्निशामक दलाचे वाहने घटनास्थळावर दाखल झाली असून आग विझविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, आगीचे लोट परिसरातील १० किलोमीटर परिसरापर्यंत दिसून येत आहेत. जो तोआग लागलेल्या फटाका कारखान्याच्या दिशेने जात असल्याचे दिसत आहे. मयतांबरोबरच जखमींना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल, पोलिस प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत दहा जणांना बाहेर काढले असून त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत.
दरम्यान, कारखान्याची राखरांगोळी तर झालीच आहे पण कारखान्यामध्ये कितीजण कामाला होते त्याचा शोध आता सुरु आहे. परिसरातील जो-तो कारखान्याकडे धाव घेत आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बार्शी तालुक्यात ही दुर्घटना घडली असून यामध्ये अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.